अनेक अपघातांच्या घटना : ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : नागरिक मोर्चा काढण्याच्या तयारीत
वार्ताहर /किणये
म्हसोबा गल्ली, ज्योतीनगर, गणेशपूर रस्त्यावरील मोरी धोकादायक बनली आहे. या मोरीचे बांधकाम अयोग्य पद्धतीने झाले असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांतून होत आहेत. या धोकादायक मोरीमुळे अनेक अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ग्रामपंचायतीला वारंवार सांगूनही याकडे दुर्लक्ष झाले आहे. येत्या आठ दिवसात बेनकनहळळी ग्रामपंचायतीने या मोरीची दुरुस्ती न केल्यास ग्राम पंचायतीवर मोर्चा काढण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.. गेल्या दीड वर्षांपूर्वी ज्योती नगरातील म्हसोबा गल्लीच्या गटरावर मोरीचे बांधकाम केले. सदर बांधकाम चुकीचे केल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे कारण रस्त्यांच्या उंचीपेक्षा मोरीचे बांधकाम जवळपास एक ते दीड फूट उंच करण्यात आले आहे. यामुळे सदर मोरीवरून जाताना वाहनधारकांना अडचण निर्माण होत आहे. बेनकनहळळी ग्रामपंचायतीने मसोबा गल्लीत मोरीचे बांधकाम केले. पण ते व्यवस्थित न केल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. रस्त्यापेक्षा उंच मोरी असल्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाणे मुश्कील बनले आहे. अनेकवेळा या मोरीच्या ठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या आहेत. गेल्या सहा-सात महिन्यापूर्वी बेनकनहळळी ग्रामपंचायतीला म्हसोबा गल्ली, ज्योती नगरातील ग्रामस्थांतर्फे निवेदन देऊन मोरीची दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. मात्र ग्रामपंचायतीचे याकडे साप दुर्लक्ष झाले असल्याच्या तक्रारी नागरिकांतून होऊ लागल्या आहेत. पीडीओंनी केवळ कार्यालयामध्ये बसून न राहता स्थानिक लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्या गल्लीमध्ये येऊन सदर मोरीची पाहणी करावी अशी मागणीही नागरिक करत आहेत
बांधकाम चुकीच्या पद्धतीने

म्हसोबा गल्लीतील रस्त्यावर बांधलेली मोरी चुकीच्या पद्धतीने बांधली आहे. उंची अधिक असल्याने वाहनधारकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. बेनकनहळळी ग्रामपंचायतीकडून याकडे कानाडोळा केला जात आहे. येत्या आठ दिवसात सदर मोरीची दुरुस्ती न केल्यास स्थानिक नागरिक ग्रामपंचायतीवर मोर्चा काढणार आहोत.
– बी डी भोसले.