पुणे / प्रतिनिधी :
नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून वेळेआधीच अंदमान समुद्रात पोहोचला असला, तरी तो त्या भागातच रेंगाळला असून, अद्याप तो पुढे सरकला नाही.
22 मे रोजी अंदमानात दाखल होणारा मान्सून यंदा तीन दिवस आधीच 19 मे रोजी दाखल झाला. दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्र मान्सूनने व्यापला आहे. मात्र, आगमन झाल्यापासून मान्सून या भागातच रेंगाळून पडला आहे. आठवडा होत आला, तरी तो पुढे सरकलेला नाही. दरम्यान, मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक वातावरण आहे. येत्या दोन दिवसांत तो दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र, अंदमान निकोबार बेटे व्यापण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला.
केरळात 4 जूनला आगमन
मान्सून अंदमानात लवकर पोहोचला असला, तरी त्याचे केरळातील आगमन लांबणार आहे. दरवर्षी साधारणपणे 1 जूनला मान्सून केरळात दाखल होतो. यंदा मात्र तो 4 जूनच्या आसपास येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.