सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
प्रतिनिधी /बेळगाव
रस्त्याशेजारी मित्राची वाट पहात थांबलेल्या व्यक्तीला बोलेरोने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. याप्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांनी बोलेरो चालक व मालकाविरोधात नुकसानभरपाईसाठी खटला दाखल केला होता. न्यायालयाने मयताच्या कुटुंबीयाला 32 लाख 44 हजार 8 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत.
मयत भारत सुधाकर बेंबाली हे दि. 28 डिसेंबर 2019 रोजी कोप्पळ जिल्ह्यातील डोनिहळ्ळी-बेनीहाळ्ळी या राष्ट्रीय मार्गावर मित्राची वाट पहात थांबले होते. यावेळी बोलेरो क्र. केए28 डी 6749 याने जोराची धडक दिली. यामध्ये भारत यांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर कोप्पळ येथील पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांनी नुकसानभरपाईसाठी येथील सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयामध्ये दावा दाखल करण्यात आला होता. त्या ठिकाणी साक्षी व पुरावे तपासण्यात आले. न्या. के. कथ्यायनी यांनी मृताची पत्नी अर्चना, मुलगी कांचन, सर्वरा, हर्षाली आणि आई कुसूम या सर्वांना न्यायाधिशांनी 32 लाख 44 हजार 8 टक्के व्याजासह देण्याचे आदेश दिले आहेत. फिर्यादिच्यावतीने अॅड. सुधीर गावडे यांनी काम पाहिले आहे.