प्रतिनिधी /मडगांव
शास्त्रीय बालशिक्षण चळवळीचे मार्गदर्शक आणि लेखक प्रा. रमेश पानसे यांचे एक जाहीर व्याख्यान येत्या गुरुवार दि. 21 जुलै रोजी फोंडय़ात आयोजित करण्यात आले आहे. खडपाबांध, फोंडा येथील विश्व हिंदु परिषद सभागृहात संध्याकाळी. 4 वाजता ‘पायाभूत शिक्षणः का ? व कसे?’ या विषयावरील हे व्याख्यान गोमंतक बालशिक्षण परिषदेने आयोजित केले आहे.
प्रा. पानसे यांचे बालशिक्षण विषयक कार्य गेली चार दशके महाराष्ट्रात सुरू आहे. डहाणू तालुक्मयातील आदिवासी भागात ‘ग्राममंगल’ संस्थेतर्फे चालणारे शैक्षणिक प्रयोग, ऐना येथील शिक्षक प्रशिक्षण केंद्र, पुण्यात चालणारे लर्निंग होम तसेच वाई येथे केलेले भाषाशिक्षणाचे प्रयोग असे विविधांगी कार्य प्रा. पानसे यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. महाराष्ट्र बालशिक्षण परिषदेच्या कार्यामुळे प्रा. पानसे सर्वपरिचित आहेत.
त्यांचे शैक्षणिक विचार त्यांच्या अनेक छोटय़ा-मोठय़ा पुस्तकांतून संकलित झाले आहेत. बालशिक्षणाची ज्ञानगंगा या पुस्तक मालिकेद्वारे या विषयावर जागृती गेली तीस वर्षे चालू आहे.
बालशिक्षण-स्वरूप आणि नवी दिशा, भाषाग्रहण व भाषाशिक्षण, शिक्षण-आनंदक्षण, नयी तालीम, शिक्षण ः परिवर्तनाची सामाजिक चळवळ, निळे आकाश-काळी माती-हिरवी झाडे अशा पुस्तकांतून पालक व शिक्षकांना त्यांचे विचार प्रेरणा देत आहेत. बालशाळातून आनंददायी शिक्षणपद्धतीची गरज त्यांच्या लेखनातून अधोरेखित होते.
नवीन शैक्षणिक धोरणात बालशिक्षणाचा स्तर ‘पायाभूत शिक्षणस्तर’ या नांवाने अंतर्भूत केल्याने शिक्षण विभागाने त्याचे नियमन, नियंत्रण व त्यासाठीचे नियोजन करायचे आहे. यात समाजाचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. प्रा. पानसे आपल्या व्याख्यानात त्या दृष्टीने मार्गदर्शन करणार आहेत.
अंगणवाडी तसेच प्राथमिक-पूर्व स्तरावरील शिक्षिकांसोबतच सर्वच स्तरांवर कार्यरत शिक्षक, मुख्याध्यापक यांना पायाभूत शिक्षणविषयक काम कसे करायचे आहे, याविषयीची दिशा प्रा. पानसे यांच्या व्याख्यानातून मिळेल.
जास्तीत जास्त पालक, शिक्षक, शिक्षण प्रेमी यांनी व्याख्यानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन गोमंतक बालशिक्षण परिषदेतर्फे सागर साकोर्डेकर व प्रा. नारायण देसाई यांनी केले आहे.