सकाळी नऊ वाजता उतरणार शंभर प्रवाशांसह इंडिगोचे पहिले विमान : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक करणार स्वागत

प्रतिनिधी /पणजी
आजपासून गोव्याचे स्वप्न सत्यात उतरतेय. ‘मोप’ येथे उभारण्यात आलेले ‘मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ’ प्रकल्पाचे राष्ट्रार्पण दि. 11 डिसेंबर रोजी झाले असले तरी प्रत्यक्षात आजपासून ते जनसेवेसाठी खुले होत आहे. आज हैद्राबादहून सुमारे 100 प्रवाशाना घेऊन येणारे इंडिगोचे पहिले विमान सकाळी 9 वा. धावपट्टीवर उतरणार आहे. दिवसभरात 11 विमाने ये-जा करतील. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच केंद्रियमंत्री श्रीपाद नाईक हे पहिल्या विमानातील प्रवाशांचे विमानतळावर स्वागत करणार आहेत.
मोप आंतरराष्ट्रीय विमानतळ ही केवळ आता कल्पना राहिली नसून प्रत्यक्षात हे विमानतळ आजपासून कार्यन्वीत होत आहे. सकाळी इंडिगोचे 6 ई 6145 क्रमांकाचे विमान मोपाच्या धावपट्टीवर उतरल्यानंतर पुढे विविध विमान कंपन्यांची विमाने येथून सेवा सुरु करणार आहेत. गेली अनेक वर्षे गोमंतकीय जनता ज्या क्षणाची वाट पाहत होती तो क्षण अखेर आज गुरुवारी आला.
लवकरच होणार आंतरराष्ट्रीय उड्डाणे
सध्या इंडिगोने मोपवर आपला काऊंटर सुरु केलेला आहे. गो फर्स्ट, विस्तारा, अकासा एअर या तीन कंपन्यांची तिकिटे काऊंटर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केलेली आहे. आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनीही विमानळाशी संपर्क साधलेला आहे. लवकरच म्हणजे बहुदा पुढील महिन्यात या विमानतळावरुन आंतराष्ट्रीय विमानांचे उड्डाण होणार आहे.
दुबईसाठी थेट बोईंग विमाने
सध्या इंडिगो व लागलीच गो फर्स्ट या कंपन्यांची विमानेही या विमातळावरुन सुरु होतील. यानंतर या विमानतळावर बोईंग विमाने देखील सुरु होणार आहेत. दुबईला जाण्यासाठी गोव्यातून थेट बोईंग विमाने सुरु केली जाणार आहेत. प्रत्यक्षात पूर्णतः हे विमानतळ 1 महिन्यानंतर वापरात येईल. दाबोळीची अनेक विमाने ही यानंतर मोपाहून उड्डाणे करतील.
गेली अनेक दिवस प्रात्यक्षिके
गेले काही दिवस या विमानतळावर येणारे प्रवासी आणि त्यांच्या हालचाली, हाताळणीसंदर्भात प्रात्यक्षिके सुरु होती. येणाऱया प्रवाशांच्या बॅगा, प्रवाशांचे विमानतळावरुन बाहेर जाणे, टॅक्सी काऊंटर, टॅक्सी चालकांचे आतमध्ये येणे व प्रवशांना घेऊन जाणे, यासाठी प्रात्यक्षिके सुरु झाली आहेत. आजपासून विमानसेवा सुरु होत असली तरी टॅक्सी काऊंटरबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र कदंबच्या बससेवा आजपासूनच सुरु होत आहेत.
मोपाकडे जाणाऱया हायवेवर 144 कलम
दरम्यान, टॅक्सीचालकांचे संप आणि आजपासून मोपा विमानतळावर विमाने उतरण्यास सुरुवात होत असल्याने येणाऱया प्रवशांना कोणाचाही त्रास होऊ नये. तसेच टॅक्सी चालकांनी संप पुकारु नये याकरिता मोप विमानतळावर जाणाऱया हायवेवर 144 कलम सरकारने लागू करण्यात आले आहे. टॅक्सीचलकांना एकत्रित राहून आंदोलन करता येणार नाही व कोणालाही अडविता येणार नाही. हा आदेश सध्यातरी बेमुदत चालू रहाणार आहे.
दरम्यान, गोवा सरकारने सुरु केलेल्या टॅक्सी ऍपचा विरोध मंदावला असून मोठय़ा प्रमाणात टॅक्सीचालक त्यात नेंदणी करु लागले आहेत. आतापर्यंत 1100 टॅक्सी चालकांनी त्यात नोंदणी केलेली आहे. त्यातील 100 टॅक्सी या ऍप अंतर्गत सेवा देण्यासाठी सज्ज झालेल्या आहेत. आज विमानतळावर प्रवाशांच्या वाहतुकीत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस फौजफाटा वाढविला जाणार आहे.
गोव्याचा आदरातिथ्याचा नावलौकिक जपूया : मुख्यमंत्री
आजपासून मोपा विमानतळावर विमानांचे आगमन व उड्डाण होणार असून त्यांतून येणाऱया-जाणाऱया प्रवाशांचे तसेच पर्यटकांचे आपण सारे मिळून स्वागत करुया आणि त्यांना आमच्या परंपरेला साजेशी सेवा देऊया, अशी भावना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले की गोवा हे भारताचे ‘गेट वे ऑफ टय़ुरिझम’ असल्याने आपण सारे मिळून मोठय़ा दिलाने सर्वांचे स्वागत करुया. गोव्याची प्रथा, परंपरा यांचे पालन करुया. येणाऱयांना पाहुणे मानून त्यांना उत्कृष्ट आदरातिथ्य, पाहुणचार देऊन आपल्या गोव्याचा नावलौकिक जपुया, असेही ते म्हणाले.
दरम्यान मोपावरील टॅक्सीचालकांचा प्रश्न सोडविण्यात सरकारला यश आल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. पिवळय़ा-काळय़ा टॅक्सींना निळा रंग देऊन त्या ‘ब्ल्यू कॅब’ म्हणून सेवा देतील. त्यांसाठी त्यांना विमानतळावर खास काऊंटरही देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगिले.
मोपावर टॅक्सीचालकांसाठी निळा रंग!
वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पेडणेतील टॅक्सीचालक जे मोप विमानतळावर आपला व्यवसाय करणार आहेत त्यांच्यासाठी सरकारने निळय़ा रंगातील टॅक्सी निश्चित केल्या आहेत. त्यानंतर मोपा विमानतळावर केवळ निळ्या रंगातील कार दिसतील. पिवळ्या-काळ्या रंगातील टॅक्सी दिसणार नाहीत. या संदर्भात आज अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. आजपासूनच या निळ्या टॅक्सींची नोंद केली जाणार आहे.