चिपळूण-कळंबट-फणसवाडीमधील घटना : चोरट्याने दागिन्यांसह रोख रक्कम चोरली
चिपळूण/प्रतिनिधी
बंद घरावरील कौले काढून घरात प्रवेश करत घरातील कपाटातील तब्बल १ लाख ७५ हजार रूपये किंमतीचा ऐवज चोरुन नेण्याची घटना तालुक्यातील कळंबट-फणसवाडी येथे घडली. या प्रकरणी सावर्डे पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबतची फिर्याद सुवर्णा कृष्णा गावडे (कळंबट-फणसवाडी) यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते ११ या कालावधीत सुवर्णा गावडे यांचे राहते घर बंद होते. चोरट्याने घरावरील कौले काढून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरातील लोखंडी कपाट उघडून लॉकर तोडून तब्बल १ लाख ७५ हजार किंमतीचा ऐवज चोरुन नेला. यामध्ये ६० हजार रोख रक्कम व १ लाख १५ हजार रूपये किंमतीच्या दागिन्यांचा समावेश आहे.