बुलक बैठकीत पुस्तकाचा परिचय
प्रतिनिधी/ बेळगाव
बुक लव्हर्स क्लबच्या बैठकीत आर. के. लक्ष्मण लिखित ‘द टनल ऑफ टाईम’ या आत्मचरित्रपर पुस्तकाचा परिचय आरती आपटे यांनी करून दिला. त्या म्हणाल्या, आठ भावंडांमध्ये लक्ष्मण हे सर्वात लहान. कडक शिस्तीचे वडील आणि मायाळू आई यांच्या संस्कारात ते घडले. शाळेत उशिरा प्रवेश घेतला आणि गणित अत्यंत नावडता विषय ठरला. तथापि, चित्रकलेकडे मात्र लहानपणीच अधिक ओढ होती. आई आणि लेखक बंधू आर. के. नारायण यांचे प्रोत्साहन त्यांना लाभले. आपल्या वडिलांचेच चित्र त्यांनी जमिनीवर रेखाटले आणि तीच त्यांच्यातील व्यंगचित्रकाराची सुरुवात ठरली.
नवव्या वर्षीसुद्धा शाळेत जायला कंटाळणारा खट्याळ लक्ष्मण पुढे जे. जे. स्कूलमध्ये दाखला नाकारल्याने खट्टू झाला. त्यानंतर हाच लक्ष्मण आंतरराष्ट्रीय ख्यातीचा राजकीय व्यंगचित्रकार होतो हे सारेच अद्भुत आहे, असे सांगून म्हैसूर, मद्रास, दिल्ली, मुंबई असा प्रवास करत ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये संपादकांच्या प्रोत्साहनाने ‘यू सेड इट’ हे शीर्षक व जगप्रसिद्ध कॉमन मॅन आजही आपल्याला आठवतो, असे त्या म्हणाल्या. प्रारंभी सहसचिव प्रा. अनघा वैद्य यांनी स्वागत व परिचय करून दिला.