क्रीडा प्रतिनिधी / फोंडा
सिकेरी स्पोर्टस् क्लबने यजमान फोंडा फुटबॉलर्स संघावर 4-0 गोलनी विजय मिळवून अखिल गोवा सेंट ऍनिस फेस्टीव्हल आंतरग्राम फुटबॉल स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश केला. सिकेरीतर्फे पहिल्या सत्रात 3 गोल नोंदविण्यात आले. पाचव्याच मिनिटाला चंदन गोवेकरने फोंडा फुटबॉलर्सच्या बचावपटूंना चकवून संघाचा पहिला गोल केला. तेराव्या मिनिटाला त्यांना मिळालेल्या पेनल्टीवर अब्दुल खानने गोल नोंदविला. लगेच मिळालेल्या दुसऱया पेनल्टीवर चंदन गोवेकरने गोल केला. दुसऱया सत्रातही सिकेरी संघाला तिसरी पेनल्टी बहाल करण्यात आली. प्रतिक तिरोडकरने ही संधी न दवडता संघासाठी चौथा गोल केला. सिकेरीचा चंदन गोवेकर सामनावीर ठरला. त्याला जॉनी वाझ यांच्याहस्ते पुरस्कार देण्यात आला.