प्रतिनिधी / बेळगाव
वडगाव बाजार गल्लीसमोरील येळ्ळूर नाका स्मार्ट बसस्टॉपची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. या बसस्टॉपच्या दुरवस्थेबद्दल तरुण भारतने अनेक वेळा वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, याकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे. गेल्या 4 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात आधीच मोडकळीस आलेल्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. या बसस्टॉपवर नेहमी वडगाव, आदर्शनगर, येळ्ळूर, धामणे मार्गांवरून येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ असते. अशा मोडकळीस आलेल्या बसस्टॉपखाली थांबणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देणे आहे. मोडलेल्या छताला प्लास्टिक दोऱ्याचा आधार देण्यात आला असून जुगाड करण्यात आला आहे. त्यामुळे हे छत कधीही कोसळू शकते. विपरित घडल्यास याला जबाबदार कोण, असा सवाल प्रवासीवर्गातून विचारला जात आहे.