वृत्ताची दखल घेऊन राबविल्या उपाय योजना : वाहनधारकांतून समाधान

प्रतिनिधी /बेळगाव
जुना धारवाड रोडला जोडण्यात आलेल्या महात्मा फुले रोड कॉर्नरच्या ठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पावसाचे पाणी साचत असल्याने या ठिकाणी वाहनधारकांना धोका निर्माण झाला होता. अखेर मनपा अधिकाऱयांनी बुधवारी सकाळी या ठिकाणचे खड्डे बुजवून पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक उपाय योजना राबविण्यात आल्या. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
महात्मा फुले रोडचे रूंदीकरण करून जुन्या धारवाड रोडला जोडण्यात आले आहे. मात्र रस्ता जोडलेल्या कॉर्नरच्या ठिकाणी रॅम्प करण्यात आले नसल्याने वाहनांना धोका निर्माण झाला होता. तसेच या ठिकाणचे डेनेज चेंबर खराब झाल्याने सांडपाणी वाहत होते. तसेच अवजड वाहने अडकून पडत होती. या रस्त्यावर मोठा खड्डा निर्माण झाल्याने दररोज दुचाकी वाहनांचे अपघात घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येणाऱया रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचून रहात आहे. विशेषतः या कॉर्नरवर मोठय़ा प्रमाणात पाणी साचून रहात होते. तसेच यामध्ये सांडपाणी देखील ओव्हरफ्लो होत होते. परिणामी ये-जा करणाऱया वाहनधारकांना अडथळा निर्माण झाला होता.
‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. याची दखल घेऊन बुधवारी सकाळी मनपाच्या सहाय्यक कार्यकारी अभियंत्या मंजुश्री यांनी पाहणी केली. तसेच याठिकाणी असलेल्या समस्येची माहिती घेऊन खराब झालेले डेनेज चेंबरचे झाकण बदलण्यात आले. तसेच या ठिकाणी निर्माण झालेल्या खड्डय़ांमध्ये खडी घालण्यात आली. त्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.