शिवपाल यादव, स्वामी प्रसाद मौर्य सरचिटणीस ः 62 सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
समाजवादी पक्षाने रविवारी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली. शिवपाल यादव यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले असून 62 सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. अखिलेश यादव यांची कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर किरणमय नंदा यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद मिळाले आहे. रामगोपाल यादव यांची राष्ट्रीय मुख्य सरचिटणीसपदी निवड करण्यात आली आहे. दुसरीकडे, या यादीतील महत्त्वाच्या नावांपैकी शिवपाल सिंह यादव, स्वामी प्रसाद मौर्य आणि आझम खान या ज्येष्ठ नेत्यांना समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले आहे. रामचरितमानसच्या वादग्रस्त विधानामुळे स्वामी प्रसाद मौर्य सध्या खूप चर्चेत आहेत. कार्यकारिणीमध्ये 11 जणांना राष्ट्रीय सरचिटणीस बनवण्यात आले असून या यादीत रविप्रकाश वर्मा, बलराम यादव, विषंभर प्रसाद निषाद, अवधेश प्रसाद, इंद्रजित सरोज, रामजीलाल सुमन, लालजी वर्मा, रामचल राजभर, जे अँटनी, हरेंद्र मलिक आणि नीरज चौधरी यांनाही स्थान देण्यात आले आहे.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तयारी सुरू करण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते बऱयाच दिवसांपासून कार्यकारिणी जाहीर होण्याच्या प्रतिक्षेत होते. आता ही यादी समोर आल्यानंतर शिवपाल यादव आणि स्वामी प्रसाद मौर्य यांच्या समर्थकांमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांना मैनपुरी लोकसभा मतदारसंघात विजय मिळवून देण्यात शिवपाल यादव यांचा मोठा वाटा होता. सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शिवपाल यादव यांचे नाव सर्वात मोठे मानले जात आहे. 2017 च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अखिलेश यादव आणि काका शिवपाल यांच्यात मोठा वाद झाला होता. हा वाद न्यायालयापर्यंतही पोहोचला होता. मात्र, त्यानंतर पक्षाला हानी होऊ नये यासाठी दोघांनीही पुढाकार घेत वादावर पडदा टाकला होता.
सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत दुसरे मोठे नाव स्वामी प्रसाद मौर्य यांचे आहे. मौर्य हे सध्या रामचरितमानसवर वादग्रस्त विधान केल्याने अडचणीत सापडले आहेत. गेल्या काही दिवसात लखनौसह उत्तर प्रदेशातील अनेक जिह्यांमध्ये स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यासोबतच त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांसह देशभरात जोरदार विरोध होत आहे. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यामुळे अखिलेश यादव धर्माच्या राजकारणात अडकू इच्छित नसल्याची चर्चा होती. मात्र, त्यानंतरही अखिलेश यादव यांनी मौर्य यांना पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस बनवले आहे.
आझम खान यांच्यावर विश्वास कायम
सपाच्या कार्यकारिणीत आझम खान यांनाही मानाचे स्थान देण्यात आले आहे. समाजवादी पक्षाचे ज्ये÷ नेते आझम खान गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात होते. योगी सरकारमध्ये त्यांच्यावर अनेक खटले दाखल झाले. तुरुंगात असताना अखिलेश यादव यांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रचंड नाराजी होती. आझम खान यांना जामीन मिळाल्यानंतरही त्यांच्या मंचावरून अनेकवेळा केलेल्या भाषणातून ही वेदना स्पष्टपणे दिसून आली. रामपूरची जागाही आझम खान यांच्या हातून निसटली असली तरी अखिलेश यादव यांनी त्यांचा पक्षातील दबदबा कायम ठेवला आहे.