आयआरसीटीसी प्रकरणी जामीन कायम : सीबीआयच्या विशेष न्यायालयात सुनावणी
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना आयआरसीटीसी घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून मंगळवारी दिलासा मिळाला आहे. सीबआयच्या विशेष न्यायालयाने तेजस्वी यादव यांचा जामीन अर्ज फेटाळला नाही. परंतु न्यायालयाने तेजस्वी यांना भविष्यात धमकीवजा वक्तव्ये न करण्याची ताकीद दिली आहे. तत्पूर्वी तेजस्वी यादव हे दिल्लीच्या राउज एव्हेन्यू न्यायालयात मंगळवारी हजर राहिले. सुनावणीवेळी न्यायाधीशांनी तेजस्वी यादव यांना विचार करून बोला असे सुनावले आहे.
उपमुख्यमंत्री पदावर असताना तुम्ही अधिकाऱयांना धमकाविणारी विधाने कशी करू शकता अशी विचारणा न्यायाधीशांनी तेजस्वी यादव यांना सुनावणीवेळी केली. तेजस्वी यांच्या विरोधात न्यायालयात भ्रष्टाचाराच्या विरोधात खटला सुरू असून ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. सीबीआयने अलिकडेच तेजस्वी यांचा जामीन रद्द करण्यासाठीचा अर्ज न्यायालयासमोर केला होता. त्यानंतर विशेष न्यायाधीश गीतांजली गोयल यांनी तेजस्वी यादव यांना नोटीस बजावून हजर राहण्याचा आदेश दिला होता.
तेजस्वी यादव यांनी एका पत्रकार परिषदेत तसेच जाहीर सभेत स्वतःच्या विरोधात सुरू असलेली चौकशी रोखण्याबद्दल विधान केले होते. तसेच त्यांनी देशातील कायदा अंमलबजावणीची थट्टा केली होती असा दावा करत सीबीआयने त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी केली होती. स्वतःच्या राजकीय शक्तीचा गैरवापर तेजस्वी यांनी केल्याचा आरोप सीबीआयने केला होता.