ऑनलाईन टीम / तरुण भारत :
दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain) यांचा तिहार तुरुंगातील (Tihar Jail) आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हायरल झालेल्या या दुसऱ्या व्हिडिओत जैन तुरुंगात हॉटेलचे जेवण जेवताना आणि फळं खाताना दिसत आहेत. त्यामुळे भाजपने तुरूंग प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण करत हा तुरूंग नसून, एखादं रिसार्ट असल्याचा आरोप केला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सत्येंद्र जैन यांना 30 मे रोजी ईडीने ताब्यात घेतलं होतं. याप्रकरणात ते सध्या तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत आहेत. मसाजच्या व्हायरल व्हिडिओनंतर जेलमधील सात नंबरच्या सेलमध्ये ते सुखासीन आयुष्य जगत असल्याचा आरोप होत होता. आता दुसऱ्या व्हायरल व्हिडिओत सत्येंद्र जैन यांच्या पलंगावर तीन डबे दिसत आहेत. तिन्ही डब्यांमध्ये वेगवेगळे पदार्थ दिसत आहेत. तसेच जैन फळं खातानाही दिसत आहेत.
तुरुंगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैन यांचे वजन आता 8 किलोने वाढले आहे. तर तुरुंगात असताना जैन यांचे वजन 28 किलोने कमी झाल्याचा दावा जैन यांच्या वकीलाने यापूर्वी केला होता.
यापूर्वी मसाजचा व्हिडिओ व्हायरल
यापूर्वी जैन यांचा तुरुंगातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये जैन यांची एकजण आरामात मसाज करत असल्याचे दिसत होते. भाजपचे प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर पोस्ट केला होता.