प्रवीण देसाई,कोल्हापूर
Kolhapur Disaster Management : अतिवृष्टी, महापूर, चक्रीवादळ, दुष्काळ यासह विविध नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सज्ज आहे काय ? असल्यास त्याचे नियोजन काय ? याची चाचपणी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने सुरु केली आहे. अत्यंत सुक्ष्म व सविस्तर माहिती प्रत्यक्ष सर्व्हे करुन वर्गवारीमध्ये भरुन देण्याचे निर्देश प्राधिकरणाला दिले आहेत. त्यानुसार प्राधिकरणाकडून यासंदर्भातील माहिती संकलनाचे काम सुरु झाले आहे. या संदर्भातील इतर जिह्यांची माहिती राज्याला टप्प्या टप्प्याने प्राप्त होत असल्याचे चित्र आहे.
अलिकडील वर्षात अतिवृष्टी, महापूरासह चक्रीवादळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नागरिकांसह शेतकर्यांना मोठा फटका बसला आहे. अजूनही तो बसतच आहे. अशा आपत्तींचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे काय नियोजन आहे ? याबाबतची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सर्व जिल्हास्तरावरुन घेतली जात आहे. त्यानुसार कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडूनही माहिती मागविली आहे. ही माहिती अत्यंत सुक्ष्म व सविस्तर पध्दतीने वर्गवारीमध्ये द्यायची आहे. यासाठी आवश्यक त्या ठिकाणी जागेवर जाऊन सर्व्हे करायचा आहे.
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला पुढील माहिती अपेक्षित आहे. कोणत्या गावात भेगा पडण्याची शक्यता आहे ? मोठे वादळ आल्यावर कोणते नुकसान होऊ शकते ? महापुराने बाधित असणारी गावे व तेथील लोकसंख्या, धोक्याची पाणी पातळी गाठलेल्या नद्यांची नावे, धोक्याची पातळी गाठलेल्या धरणांची यादी, पूरस्थितीमुळे होणारे जीवितहानी, पिकांचे नुकसान आणि मालमत्तेचे नुकसान, आपत्ती संदर्भातील नागरिकांचे अभिप्राय (लेखी व व्हिडीओसह), आपत्तीमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘एनजीओ’, सोसायटी आणि इतर कोणत्याही खाजगी संस्थांची यादी आदी महत्वपूर्ण माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने पाठविलेल्या चार्टमध्ये वर्गवारीनुसार भरुन द्यायची आहे. राज्यातील इतर जिह्यांकडून टप्प्या टप्प्याने ही माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाला प्राप्त होत आहे, असे सुत्राकडून सांगण्यात आले.
जिह्यातील ठळक माहिती
जिह्यातील ठळक माहितीही मागविली आहे. यामध्ये जिह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र, जिह्यातील एकूण पोलीस ठाण्यांची संख्या, महापालिका, नगर परिषदा व ग्रामपंचायतींची संख्या, अग्निशमन वाहनांची संख्या, पोलीस पाटीलांची संख्या, रासायनिक उद्योग किती ?, लागवडीखालील क्षेत्र (हेक्टरमध्ये), सरासरी पाऊस (मि.मी.मध्ये), एकूण लोकसंख्या (ग्रामीण व शहरी अशा वर्गवारीत), पूरप्रणव लोकसंख्या, पूरप्रणव तालुके, प्रमुख धरणांची संख्या, सरकारी व खासगी शाळांची संख्या, आपदा मित्रांची संख्या व त्यांचे संपर्क दुरध्वनी क्रमांक, अग्निशमन वाहने नसलेल्या शहरांची संख्या अशा महत्वपूर्ण माहितीचा समावेश आहे.
Previous Articleशहरात आज लक्ष्मी पूजनाची धामधूम
Next Article पेडणे तालुक्यातील धोकादायक रस्ते त्वरित दुरुस्त करा
Related Posts
Add A Comment