नवा व्हेरियंट किंवा विषाणू येऊ शकतो : अधिक जीवघेण्या महामारीसाठी तयार रहा
वृत्तसंस्था/ जीनिव्हा
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) कोरोनानंतर पुढील महामारीसंबंधी इशारा दिला आहे. जगाला पुढील जागतिक महासाथीसाठी तयार रहावे लागेल. ही साथ कोरोनापेक्षाही अधिक धोकादायक असू शकते असे उद्गार डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनम घेब्रेयसस यांनी काढले आहेत.
स्वीत्झर्लंडच्या जीनिव्हामध्ये पार पडलेल्या 76 व्या जागतिक आरोग्य संमेलनाच्या बैठकीत डब्ल्यूएचओने स्वत:चा अहवाल मांडला आहे. कोरोना आता भले जागतिक आपत्कालीन संकट नसले तरीही यामुळे कुठलाच धोका नाही असा याचा अर्थ नाही. कोरोनाचा नवा व्हेरियंट कधीही येऊ शकतो. एखादा नवा अधिक धोकादायक आजार उद्भवण्याचीही शक्यता आहे. अशा स्थितीत आम्हाला आतापासून तयारी करावी लागणार असल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे.
बळीचा आकडा 2 कोटीहून अधिक
कोरोना हा नव्या शतकातील सर्वात धोकादायक आजार ठरला. कोरोना संकटाच्या प्रारंभी आम्ही याचा मुकाबला करण्यासाठी तयार नव्हतो. परंतु दुसरी महामारी निश्चितच येईल आणि आम्हाला सर्वप्रकारे एकत्र येत याला सामोरे जावे लागणार आहे. कोरोनामुळे सुमारे 70 लाख लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, परंतु प्रत्यक्षात हा आकडा 2 कोटीपेक्षा अधिक असू शकतो. हे पाहता आम्हाला आरोग्य क्षेत्रात लवकरात लवकर बदल घडवून आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
जागतिक आरोग्यासाठी आव्हानात्मक
2017 च्या जागतिक आरोग्य संमेलनात घोषित ट्रिपल बिलियन लक्ष्य मोहिमेच्या प्रगतीला महामारीने प्रभावित केले आहे. कोरोना आमच्या उद्दिष्टांसाठी मोठे आव्हान ठरले असले तरीही शाश्वत लक्ष्यांवर एकाग्र का असावे हे यातून आम्हाला समजले. नव्या पिढीत महामारीशी तडजोड न करण्याची प्रतिबद्धता आहे, कारण या लोकांनीच एका छोटासा विषाणू किती भयावह ठरू शकतो याचा अनुभव घेतला असल्याचे टेड्रोस यांनी म्हटले आहे.
यापूर्वी 5 मे रोजी डब्ल्यूएचओने कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणी नसल्याची घोषणा केली होती. वेगाने कमी होत चाललेली रुग्णसंख्या अन् मृत्यूंचा खालावलेला आकडा या निर्णयासाठी कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले होते. लसीकरणामुळे आम्हाला मोठे यश मिळाले आहे. आरोग्य यंत्रणेवरील ताण आता बऱ्याचअंशी कमी झाला आहे. बहुतांश देश पूर्वपदावर परतल्याचे टेड्रोस यांनी म्हटले होते.