लंडनमध्ये पार पडला लिलाव : अपेक्षेपेक्षा 7 पट अधिक मिळाली किंमत
वृत्तसंस्था /लंडन
लंडनमध्ये टिपू सुलतानची 18 व्या शतकात तयार करण्यात आलेली तलवार 143 कोटी रुपयांमध्ये विकली गेली आहे. यासंबंधीची माहिती ऑक्शन हाउस बोनहम्सने दिली आहे. लिलावातून मिळालेली रक्कम ही अपेक्षेपेक्षा 7 पट अधिक असल्याचे सांगण्यात आले. टिपू सुलतानच्या महत्त्वाच्या अस्त्रांमध्ये या तलवारीचा समावेश होता. तसेच या तलवारीच्या मुठीवर सोन्याद्वारे ‘शासकाची तलवार’ असे लिहिलेले होते. जर्मन ब्लेडद्वारे ही तलवार तयार करण्यात आली होती. लिलावादरम्यान तलवार खरेदी करण्यासाठी लोकांदरम्यान चढाओढ दिसून आल्याचे ऑक्शन हाउसच्या निमा साघार्ची यांनी सांगितले आहे. टिपू सुलतानच्या पराभवानंतर 4 मे 1799 रोजी श्रीरंगपट्टणम येथील महालातून त्यांच्या अनेक अस्त्रांना लुटण्यात आले होते. यात या तलवारीचा समावेश होता. ऑक्शन हाउसनुसार टिपू सुलतान यांची तलवार ब्रिटिश सैन्याधिकारी मेजर जनरल डेव्हिड बायर्ड यांना नजराण्यादाखल देण्यात आली होती. टिपू सुलतानच्या तलवारीसोबत चीनचे अखेरचे राजा एसिन गिओरो पुई यांच्या घड्याळाची लिलावात विक्री झाली आहे. या घड्याळाला 51 कोटी रुपयांची किंमत मिळाली आहे. हे घड्याळ एका आशियाई वंशाच्या व्यक्तीने खरेदी केले आहे. हा व्यक्ती फोनच्या माध्यमातून लिलावात सामील झाला होता. पुई यांनी हे घड्याळ स्वत:च्या रशियन दुभाषीला दिले होते. या दुभाषाला पुढील काळात रशियात कैद करण्यात आले होते.