राजस्थानातील जोधपूर रेल्वे स्थानकाचा लवकरच कायापालट होणार आहे. त्यासाठी 500 कोटी रुपये खर्च केले जाणार असून हे स्थानक एकाद्या पंचतारांकित हॉटेलासारखे भासणार आहे. याच वर्षीच्या ऑक्टोबरपासून नूतनीकरणाच्या कार्याचा शुभारंभ केला जाणार आहे. प्रवाशांना हे रेल्वेस्थानक नसून एखादे विमानतळ असावे असा आभास होणार आहे, असे रेल्वेविभागाचे म्हणणे आहे. वायव्य रेल्वे विभागाची ही योजना लवकरात लवकर साकार केली जाणार असून राजस्थानात यामुळे पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल अशी शक्यता आहे.

नूतनीकरणानंतर या स्थानकाची मुख्य इमारत पाच मजली होणार आहे. या इमारतीत स्थानकाचे मुख्य कार्यालय ग्राऊंड फ्लोअरवर स्थापन होणार आहे. याशिवाय व्हीआयपी लाँज, स्टेशन मास्टर कार्यालय, आरपीएफ आणि जीआरपी कार्यालयेही अत्याधुनिक सोयींनी युक्त अशी बनविली जाणार आहेत. एसी, नॉनएसी रिटायरिंग रुम्स, पेट वेटिंर रुम्स, खाण्यापिण्याचे स्टॉल्स, आणि स्थानिक उत्पादनांच्या विक्रीची दुकाने वरच्या मजल्यांवर होणार आहेत.
स्थानकावरील विविध प्लॅटफॉर्म्सना जोडण्यासाठी एअर कॉनकोर्स तयार केला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या रेल्वेपर्यंत पोहचणे सहज आणि सोपे होणार आहे. या स्थानकाचे दुसरे प्रवेशद्वारही तीन मजली होणार असून तेथेही अनेक सुविधा प्रवाशांसाठी सज्ज असतील. तसेच स्थानकावर मिळणाऱया खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेही मोठय़ा प्रमाणावर सुधारणा केली जाणार असून पोषणयुक्त आहारावर भर दिला जाणार आहे. प्रवाशांसाठी वायफाय कनेक्शन आणि इतर सुविधा तर असतीलच. हे स्थानक आरशासारखे स्वच्छ रहावे यासाठीही विशेष योजना करण्यात आली आहे. अशा प्रकारची 24 अत्याधुनिक रेल्वे स्थानके निर्माण करण्यासाठी रेल्वेने महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे.