पंजाब पोलिसांसह सीआरपीएफ जवानांचे सुरक्षाकवच प्राप्त
वृत्तसंस्था /चंदीगड
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना केंद्र सरकारने झेड प्लस सुरक्षा पुरविली आहे. आता त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. केंद्रीय गुप्तचर संस्था ‘आयबी’च्या अहवालानंतर भगवंत मान यांना केंद्रीय गृह मंत्रालयाने झेड प्लस सुरक्षा श्रेणी प्रदान केली आहे. पंजाब पोलिसांच्या सुरक्षेशिवाय, अद्ययावत सुरक्षा कवच मुख्यमंत्र्यांचे घर आणि जवळच्या कुटुंबीयांचेही संरक्षण करेल. सीमावर्ती राज्यातील खलिस्तानी कारवायांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा धोका इशारा विश्लेषण अहवाल तयार करताना केंद्रीय गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांनी मान यांच्यासाठी झेड प्लस सुरक्षा कवचाची शिफारस केली होती. देशांतर्गत आणि परदेशातील संभाव्य धोके लक्षात घेऊन केंद्राने पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना झेड प्लस श्रेणीची सशस्त्र सुरक्षा प्रदान केल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी गुरुवारी दिली. त्यानुसार आता 49 वर्षीय भगवंत मान यांना केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) व्हीआयपी सुरक्षा पथकाकडून संरक्षण दिले जाईल. मान यांच्या सुरक्षेचे विश्लेषण केल्यानंतर त्यांना ही सुरक्षा देण्यात आली आहे. सीआरपीएफ लवकरच हे काम हाती घेणार असून त्यासाठी 55 सशस्त्र जवानांची तुकडी तैनात करण्यात आली आहे.