प्रतिनिधी /पणजी
काँग्रेसच्या माजी नेत्या तथा पुंकळ्ळीच्या माजी नगराध्यक्ष अँजेला लुईस यांनी रविवारी गोवा तृणमूल काँग्रेस पक्षात प्रवेश केला. पक्षाच्या नेत्या स्वाती केरकर, मारियो पिंटो आणि प्रसारमाध्यम प्रभारी ओमप्रकाश मिश्रा यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
पणजीतील पक्षकार्यालयात झालेल्या प्रवेश सोहळ्यात बोलताना श्रीमती लुईस यांनी, काँग्रेसने गोव्यात कोणताही विकास केला नाही. विकासात ते पूर्णतः अपयशी ठरले. त्यामुळे लोकांचा आता काँग्रेसवर विश्वास राहिलेला नाही, म्हणुनच आपण गोवा टीएमसीमध्ये प्रवेश केला, असे सांगितले.
तृणमूलच्या राष्ट्रीय अध्यक्ष ममता बॅनर्जी आणि डॉ. जोर्सन यांच्या नेतृत्व आणि वचनबद्धतेवर प्रभावित होऊन आपण तृणमूलमध्ये प्रवेश केला असून त्यांनी दाखविलेल्या मार्गानेच जाणार असल्याचे त्या म्हणाल्या.
श्रीमती लुईस यांचे पक्षात स्वागत करताना पिंटो यांनी त्यांच्या प्रवेशामुळे कुंकळ्ळीत आमचा पाया मजबूत झाला आहे, असे सांगितले. श्रीमती केरकर यांनी ’दीदींच्या पावलावर पाऊल ठेवून गोवा तृणमूल अधिकाधिक महिलांना पक्षात प्रवेश घेण्यास प्रोत्साहित करत आहे, असे त्या म्हणाल्या.
गोव्यात टीएमसीमध्ये सामील होणारे लोक एकतर तळागाळातील राजकीय कार्यकर्ते आहेत किंवा समुदाय विकास कार्यक्रमांशी संबंधित आहेत, असे मिश्रा यांनी नमूद केले.