तक्रारी- दुरुस्तीची प्रक्रियाही लवकरच
प्रतिनिधी / बेळगाव
निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार मतदारयाद्यांची दुरुस्ती तसेच नवीन नावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मतदारयाद्यांचे काम आता पूर्ण झाले आहे. 18 जानेवारी 2021 ला नवीन मतदारयाद्या प्रसिद्ध होणार आहेत. त्यानंतर पुन्हा त्याबाबतच्या तक्रारी तसेच नवीन नावे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. याबाबत अधिकाऱयांना जनजागृती करण्याची सूचना केली असल्याची माहिती जिल्हय़ाचे प्रभारी सचिव ए. के. अतिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही माहिती दिली. मतदार गणती मतदान केंद्राच्या माध्यमातून सुरूच आहे. 18 वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येकाचे नाव या मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचबरोबर महिलांची नावे नोंदविण्याची संख्या काहीशी कमी आहे. मात्र, तरीदेखील त्यांचीही नावे अधिक प्रमाणात दाखल करण्यासाठी सूचना केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. संपूर्ण देशामध्येच मतदारयाद्यांचे काम सुरू आहे. मतदार यादीमध्ये नावे नोंदविण्याचा गुरुवार दि. 17 रोजी शेवटचा दिवस आहे. त्यानंतर या मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
नावे दुरुस्ती, पत्ता बदलणे यासह इतर तक्रारी ऐकून घेऊन तसेच अर्ज स्वीकारून त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. 18 जानेवारीला अंतिम मतदार यादी जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.