नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताने बुधवारी ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची जमिनीवरून जमिनीवर मारा करण्याची यशस्वी चाचणी केली. ही चाचणी अंदमान निकोबारमध्ये करण्यात आली. या क्षेपणास्त्राने अंतर वाढवलेल्या लक्ष्यावर अचूक मारा केला. यासाठी क्षेपणास्त्रात कोणताही बदल करण्यात आलेला नसून सॉफ्टवेअरच्या मदतीने अपग्रेड करण्यात आले आहे. अलीकडेच, ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची रेंज 500 किमीपर्यंत वाढवण्यात आली होती. आता क्षेपणास्त्राचा पल्ला 300 ते 800 किमीपर्यंत वाढला आहे. ब्राह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या या यशस्वी चाचणीबद्दल एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी यांनी अभिनंदन केले आहे. एअर चीफ मार्शल चौधरी अंदमान-निकोबार बेटांच्या केंद्रशासित प्रदेशात चाचणीच्या सज्जतेचा आढावा घेण्यासाठी उपस्थित होते. दुसरीकडे, ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या ‘मिस’ फायरिंगच्या घटनेची हवाई मुख्यालयाचे एअर व्हाईस मार्शल सविस्तर चौकशी करत आहेत. 9 मार्च रोजी हे क्षेपणास्त्र चुकून पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते.