तासभर थांबवली दर्शन रांग; तपासणीवेळी कमालीची गुप्तता
कोल्हापूर / प्रतिनिधी
करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेला गुरुवारी दुपारी बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याच्या अफवेने खळबळ उडाली. पोलिस दलासह बॉम्ब शोधपथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपासणीअंती कोणतीही बॉम सदृश वस्तू नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, तपासणीदरम्यान सुमारे तासभर मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.
यासंदर्भात पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी अंबाबाईची पूजा झाल्यानंतर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सांगली येथून एक निनावी फोन कोल्हापूरच्या पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात आला. फोन वरील व्यक्तीने अंबाबाई मंदिरातील गाभार्यात जवळ बॉमब सदृश्य वस्तू असल्याचे सांगितले. या कॉलनंतर पोलिस यंत्रणा हादरून गेली.
पोलीस अधीक्षक शैलेश बळकवडे, अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, वरिष्ट पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांचा फौजफाटा मंदिरात दाखल झाला. यामध्ये बॉम्बशोध पथक, श्वानपथक यांचे अधिकारी होते. त्या सर्वांनी तातडीने मंदिराचा ताबा घेतला. मंदिरात देवीच्या दर्शनासाठी सुरू असलेली दर्शन रांग तातडीने थांबवण्यात आली. दर्शन रांग थांबवताना प्रचंड गोपनीयता पाळण्यात आली. तपासणी पथकांनी तातडीने मंदीरातील प्रत्येक कानाकोपऱ्यात मेटल डिटेक्टरच्या साह्याने संशयित वस्तू सोडण्यास प्रारंभ केला. सुमारे तासभराच्या तपासणीनंतर कोणतीही संशयास्पद वस्तू मंदिर अथवा परिसरामध्ये आढळली नाही, अशी माहिती पोलिस अधिकार्यांनी दिली.