क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेतील अकरा गोलांची थरारक लढत ओडिशा एफसीने जिंकली. बांबोळीतील जीएमसी स्टेडियमवर ओडिशा एफसीने एससी ईस्ट बंगालचा 6-5 गोलानी पराभव केला.
ओडिशा एफसीसाठी पॉल रामफेंगजावूआ, जॅरी माविहमिंगथांगाने प्रत्येकी 2, लालरेझुआला, डायगो मॉरिसियोने प्रत्येकी 1 गोल केला. पराभूत बंगालसाठी अँथनी पिलकिंगटन, होल्लावे व जेजे लालपेखलुवाने प्रत्येकी 1 गोल केला तर ओडिशा गोलरक्षक रवीकुमारद्वारे सेल्फगोल झाला.
ओडिशाचा स्पर्धेतील दुसरा विजय ठरला. त्यांचे 20 सामन्यांतील दोन विजय, सहा बरोबरी आणि बारा पराभवाने 12 गुण झाले व शेवटचे स्थान कायम राहिले. बंगालचे 20 सामन्यांतून 3 विजय, 8 बरोबरी व 9 पराभवाने 17 गुण झाले, नववे स्थान कायम राहिले.
पहिल्या सत्रात ईस्ट बंगालने 2-1 अशी आघाडी घेतली होती. 24व्या मिनिटाला लूवांगने दिलेल्या पासवर अँथनी पिलकिंगटनने गोल करून ईस्ट बंगालला आघाडीवर नेले. मात्र ही आघाडी 33व्या मिनिटाला लालरेझूआलाने ब्रॅड्डन इनमेनच्या पासवर गोल करून रद्द केली. चारच मिनिटांनी ओडिशाचा गोलरक्षक रवीकुमार याच्याकडून सॅल्फ गोल झाल्याने मध्यतंराला ईस्ट बंगालकडे 2-1 अशी आघाडी होती.
दुसऱया सत्रात आठ गोल झाले. प्रथम 49व्या मिनिटाला पॉल रामफेंगजावूआने ओडिशाचा गोल करून सामना 2-2 असा बरोबरीत आणला. दोन मिनिटांनी माविहमिंगथांगाने ऑन्वूच्या पासवर गोल करून ओडिशाला 3-2 अशी आघाडी प्राप्त करून दिली. 60व्या मिनिटाला बंगालच्या ऍरोन होल्लोवेने गोल करून ईस्ट बंगालसाठी सामना 3-3 असा बरोबरीत आणला.
यानंतर ओडिशाने 4 मिनिटांत 3 गोल केले आणि आघाडी 6-3 अशी वाढविली. हे गोल रामफेंगजावूआ, माविहमिंगथांगा व डायगो मॉरिसियोने केले. शेवटच्या क्षणी ईस्ट बंगालने दोन गोल केले. हे गोल जेजे लालपोखलुवा आणि ऍरोन होल्लोवे यांनी केले.