नवी दिल्ली
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अखिलेश यादव हे उत्तरप्रदेशच्या आझमगडचे खासदार होते. त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेत राजीनाम्याचे पत्र मंगळवारी सोपविले आहे. अखिलेश अलिकडेच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत करहलचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. अखिलेश यांच्यासोबत सपचे वरिष्ठ नेते आझम खान यांनीही लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आझम खान हे रामपूरचे खासदार होते. त्यांनी रामपूर विधानसभा मतदारसंघात विजय मिळविला आहे. अखिलेश यादव हे आता राज्याच्या राजकारणात पूर्णपणे सक्रीय राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाचे संस्थापक आणि स्वतःचे वडिल मुलायम सिंह यादव यांच्या सुचनेनुसार अखिलेश यांनी हा निर्णय घेतल्याचे समजते.