प्रतिनिधी/इचलकरंजी
प्लॅस्टिकमुक्त शहरासाठी पालिकेची अनास्था असल्याचा आरोप करत काही नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेत पालिकेकडे जमा झालेल्या कापडी पिशव्या आज, शुक्रवारी विकली मार्केटमध्ये जाऊन नागरिकांना वितरित केल्या. नगरसेवक शशांक बावचकर, ध्रुवती दळवाई, रुपाली कोकणे, शकुंतला मुळीक यांनी हया कापडी पिशव्या नागरिकांना वितरित केल्या. शुक्रवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने पिशव्या घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. इचलकरंजी शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी शहरातील सहकारी संस्था व बँकांनी 6 महिन्यांपूर्वी पालिकेला या पिशव्या मोफत दिल्या होत्या.
जुन्या नगरपालिकेच्या शौचालय विभागात यातील दिड हजाराहून अधिक कापडी पिशव्या धूळखात पडून आहेत. जमा झालेल्या सुमारे 5 हजार पिशव्या वाटपाचा शुभारंभ 1 डिसेंबरला केला होता. त्यानंतर यातील बहुतांशी पिशव्या पडूनच होत्या. याबाबत मुख्याधिकारी व नगराध्यक्षा यांच्याकडे या कापडी पिशव्याचें वाटप करण्यासाठीची वेळोवेळी मागणी करूनही याबाबत पालिकेने गांभीर्य दाखवले नसल्याचे बावाचकर यांनी सांगितले.
शहर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी पालिकेला मोफत मिळालेल्या कापडी पिशव्या वाटण्याचीही तसदी घेता आली नाही. त्यामुळे काही नगरसेवकांनी थेट जुन्या नगरपालिकेत जाऊन पडून असणाऱ्या कापडी पिशव्या विकली मार्केट मध्ये नागरिकांना वाटल्या.