वृत्तसंस्था/ ताश्कंद
भारताचा वेटलिफ्टर अजय सिंगने येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या 81 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकावले. या यशामुळे त्याला पुढील वर्षी बर्मिंगहॅममध्ये होणाऱया राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी थेट प्रवेश मिळाला आहे.
24 वर्षीय अजय सिंगने एकूण 322 (147 व 175) किलो वजन उचलत सुवर्ण मिळविले. स्नॅचमध्ये त्याने 147 किलो वजन उचलत नवा राष्ट्रीय विक्रमही नेंदवला. पुढील वर्षी होणाऱया राष्ट्रकुल स्पर्धेसाठी पात्र ठरणारा अजय सिंग हा तिसरा भारतीय वेटलिफ्टर आहे. याआधी जेरेमी लाललिननुन्गा, अचिंता शेउली यांनी पात्रता मिळविली आहे. शनिवारी महिलांमध्ये हजारिका पॉपीने स्नॅचमध्ये 84 किलो आणि क्लीन व जर्कमध्ये 105 किलो असे एकूण 189 किलो वजन उचलत रौप्यपदक मिळविले होते.
राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप व वर्ल्ड वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन्ही स्पर्धा एकाचवेळी येथे घेण्यात येत असून 7 डिसेंबरपासून सुरू झालेल्या या स्पर्धेचा समारोप 17 डिसेंबर रोजी होणार आहे. भारत हा राष्ट्रकुल देश असल्याने या स्पर्धांत सहभागी झाला आहे.