कनिष्ठ राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/ पुणे
येथे झालेल्या कनिष्ठांच्या राष्ट्रीय रोईंग चॅम्पियनशिपमध्ये प.बंगालच्या द्रिकप्रिया पॉलने महिलांच्या सिंगल स्कल प्रकारात रौप्यपदक पटकावले. मात्र शर्यत संपल्यानंतर लगेचच तिला भोवळ आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
16 वर्षीय द्रिकप्रियाने 1000 मी.च्या या शर्यतीत कठोर परिश्रम घेत मध्य प्रदेशच्या मोनिका भदोरियानंतर दुसरे स्थान मिळविले. केरळची मरियन बेलिंडा तिच्या मागे राहिल्याने तिला तिसरे स्थान मिळाले. या कामगिरीनंतर द्रिकप्रियाला इतका थकवा आला की फिनिश लाईन पार केल्यानंतर ती भोवळ येऊन पाण्यात पडली. सुदैवाने सुरक्षा रक्षक कणव कटयाल यांनी प्रसंगावधान दाखवत त्वरित तिच्याकडे धाव घेतली आणि तिला पुन्हा बोटमध्ये उचलून ठेवले. तिने मार्शल आर्ट्स व जलतरण या क्रीडाप्रकारातही सुरुवातीला लक्ष घातले होते. पण नंतर तिने रोईंगवर पूर्ण वेळ लक्ष केंद्रित केले. तिने कलरिपयट्टू व कराटेमध्ये कनिष्ठ राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदके मिळविली आहेत. पण या सर्व कौशल्याचा तिला अगदी महत्त्वाच्या वेळी उपयोग होऊ शकला नाही. ‘शर्यत संपल्यानंतर डोळय़ासमोर अंधारी आली आणि मी बेशुद्ध झाले. माझे जीवरक्षण करणाऱया व्यक्तींचे मी मनापासून आभार मानते,’ असे ती नंतर म्हणाली.
तिचे हे राष्ट्रीय स्तरावरील दुसरे पदक असून याआधी 2019 मध्ये सिंगल स्कल उपकनिष्ठ विभागात तिने कांस्यपदक मिळविले होते. ‘सिंगल स्कल किंवा रोईंगच्या कुठल्याही प्रकारात खेळण्यासाठी आवश्यक असणारी उंची माझ्याकडे नाहे. पण माझा तो अत्यंत आवडता क्रीडा प्रकार असल्याने मला कठोर परिश्रम करावे लागतात,’ असे 5 फूट दोन इंच उंचीची द्रिकप्रिया म्हणाली.