8 गीगावॅटचा प्रकल्प, राजस्थान किंवा गुजरामध्ये शक्य
वृत्तसंस्था / मुंबई
अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेड या कंपनीला जगातील सर्वात मोठय़ा सौरऊर्जा प्रकल्पाचे कंत्राट मिळाले आहे. सोलार एनर्जी कार्पोरेशन ऑफ इंडियाकडून मिळालेला हा प्रकल्प अंदाजे 6 अब्ज डॉलर म्हणजेच 45 हजार कोटी रुपयांचा असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.
8 गीगा वॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प तसेच अतिरीक्त 2 गीगा वॅटच्या प्रकल्पाचे अदानीला पूर्ण करण्यासाठी कंत्राट मिळाले आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून अंदाजे 4 लाखहून अधिक जणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या रोजगार मिळू शकणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे. या कामासह कंपनीच्या ताफ्यातील कामाची क्षमताही आता वाढणार आहे. सध्या 15 गीगा वॅट क्षमतेचे प्रकल्प कंपनी राबवत आहे. सन 2025 पर्यंत जगात सर्वात मोठी कंपनी होण्याचे स्वप्न कंपनीने बाळगले आहे. अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी सदरच्या प्रकल्पासाठी सोलार एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे केलेल्या निवडीबद्दल आभार मानले असून आपण सदरचा प्रकल्प निश्चितच पूर्ण करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सदरचा नवा सौरऊर्जा प्रकल्प राजस्थान किंवा गुजरात राज्यात निर्मिला जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. राजस्थान सरकारने जैसलमेर, बिकानेर, जालोर आणि बाडमेर येथे सोलार प्लांटसाठी मंजुरी दिली असल्याचेही समजते. तर दुसरीकडे गुजरातमध्ये कच्छमध्येही सोलार प्रकल्प राबवला जाऊ शकतो, असेही सांगितले जात आहे.