प्रतिनिधी / पणजी
माजी आमदार, मंत्री रमेश तवडकर यांची गोवा अनुसूचित जाती, जमाती आयोगाच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून ती तीन वर्षासाठी आहे. ते भाजप गोवा प्रदेशाचे उपाध्यक्ष असून सरकारने त्यांच्याकडे आयोगाची जबाबदारी सोपवली आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारण, समाजकारणात असून मंत्री, आमदार तसेच इतर अनेक महत्वाची पदे त्यांनी भुषविली आहेत. एससी आणि एसटी साठी त्यांनी गोव्यात मोलाची कामगिरी केली असून त्याची दखल घेऊनच त्यांची वर्णी आयोगावर लावण्यात आली आहे.
माजीमंत्री रमेश तवडकर यांनी 1995 साली आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात करताना आदर्श युवा संघाची स्थापना केली. संघातर्फे आयोजित लोकोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण संस्कृतीला उजाळा दिला. एक आदर्श शिक्षक ते क्रियाशील शेतकरी अशी आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. गाकुवेध, उटा चळवळीतून आदिवासी समाजाला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी बलराम शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. तसेच शेतकऱयांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी गावडोंगरी व खोतीगाव अशा दोन फार्मिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले. सामाजिक कार्य करतानाच 1999 पासून भारतीय जनता पार्टीच्या कार्याला सुरुवात केली. याची दखल घेऊन पक्षाने त्यांना 2005 साली विधानसभा निवडणुकीत तिकीट दिले. 2005, 2007, 2012 अशी सलग तीनवेळा ते आमदार म्हणून निवडून आले. 2012 वर्षी भाजपच्या नेतृत्त्वाखाली स्थापन झालेल्या गोवा सरकारात त्यांना क्रीडा, कृषी, आदिवासी, पशुसंवर्धन अशा महत्त्वाच्या मंत्रिपदांची जबाबदारी मिळाली आणि त्यांनी उच्च स्थानावर झेप घेतली. आपल्या खात्यांना योग्य न्याय देऊनही 2017 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना तिकीट नाकारले. असे असूनही मागे न हटता अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवून आपली क्षमता सिद्ध केली. त्यांची क्षमता ओळखून पुन्हा एकदा पक्षाने त्यांना मानाने बोलावून प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली. सध्या ते पक्षाच्या कोअर कमिटीचे सदस्य आहेत. आता गोवा सरकारने त्यांच्याकडे एसटी एससी आयोगाचा पदभार सोपवून सन्मान केला आहे. यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.