सुमारे 261 ब्रास वाळू : कुडाळ तहसीलदारांकडून पाहणी : जमीन मालकास नोटीस
प्रतिनिधी / कुडाळ:
कुडाळ दत्तनगर व नेरुरच्या हद्दीवर असलेल्या वाळू साठय़ाच्या ठिकाणी रविवारी सायंकाळी पिंगुळी शेटकरवाडी येथील संतोष गंगाराम सावंत (43) हा कामगार डंपरखाली सापडून मृत्युमुखी पडला. रविवारी रात्रीच कुडाळचे तहसीलदार रवींद्र नाचणकर यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर तेथे वाळूचा बेकायदा मोठा साठा असल्याचे उघड झाले. सुमारे 261 ब्रास वाळू असल्याचा अंदाज वालावल मंडळ अधिकाऱयांनी अहवालात नमूद केला. दरम्यान, संतोष वसंत सडवेलकर यांच्या मालकीच्या जागेत बेकायदा वाळूसाठा सापडून आल्याने तहसीलदारांनी त्यांना नोटीस बजावली आहे.
रविवारी सायंकाळी बेकायदा वाळूसाठा करून तेथून वाळू भरून डंपर बाहेर जाताना चालकाचे डंपरवरील नियंत्रण सुटले आणि सावंत हा कामगार डंपरखाली चिरडला गेला. अपघात हे होतातच. मात्र, त्यानंतर बेकायदा वाळू साठा व त्यामुळे घडलेला प्रयत्न दडपण्यासाठी काही वाळू व्यावसायिकांनी केलेले प्रयत्न लाजारवाणे होते, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होती. कामगार गेला तरी हरकत नाही, पण आमचा बेकायदा वाळू व्यवसाय टिकला पाहिजे, अशी भूमिका वाळू व्यावसायिकांची होती, अशीच चर्चा होती. तहसीलदार नाचणकर यांनी वाळू साठय़ाची पाहणी केली. कुडाळ तालुक्यात वाळू लिलाव झाला नाही. असे असताना एवढा वाळूसाठा असल्याने तो विनापरवाना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मोठा बेकायदा वाळूसाठा
संतोष सडवेलकर यांना कुडाळ तहसीलदारांनी अनधिकृत वाळू साठय़ाबाबत नोटीस बजावली आहे. ‘माणकादेवी कुडाळ येथील स. नं. 6 हि. नं. 19 पैकी जमीन आपल्या मालकीची असून सदर जागेत 261.28 ब्रास विनापरवाना वाळूसाठा केला असल्याचे मंडळ अधिकारी (वालावल) यांनी पत्राने माझ्या निदर्शनास आणून दिले आहे. कुडाळ तालुक्यात वाळू लिलाव न झाल्याने सदर साठा बेकायदेशीर असल्याचे गृहित धरणे आवश्यक आहे. शासन निर्णयानुसार विनापरवाना गौण खनिज (वाळू) उत्खनन आढळल्यास सदर वाळूचा लिलाव करून लिलावाची रक्कम शासनास जमा करणे आवश्यक आहे. सदर वाळू साठय़ाचा लिलाव का करण्यात येऊ नये? तसेच विनापरवाना वाळू साठय़ाबाबत आपल्यावर फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? याबाबत कायदेशीर पुराव्यांच्या कागदपत्रांसह आपला खुलासाही नोटीस पोहोचताच आठ तासात समक्ष हजर राहून करावा. अन्यथा याबाबत आपणास काहीही सांगायचे नाही, असे गृहित धरून वाळूसाठय़ाचा लिलाव व आपणाविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याबाबत एकतर्फी कारवाई करण्यात येईल’, असे नोटिसीत म्हटले आहे.
पोलिसांना कल्पना दिली, पण..
आपण याबाबत कुडाळचे पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना यापूर्वी कल्पना देऊन अशा पद्धतीने रात्रभर तहसीलदार, प्रांत कार्यालयाबाहेर थांबणाऱयांना ताब्यात घेऊन कारवाई करावी, असे सूचित केले. मात्र, अद्याप कारवाई झाली नसल्याचे तहसीलदार म्हणाले.
रात्रीच वाळू व्यवसायिक पळाले
रात्री घटनास्थळाहून 11 च्या सुमारास गस्त घालून तहसील कार्यालयाकडे आले असता मोठय़ा प्रमाणावर तरुण दिसून आले. तेव्हा आपण जीप वरच्या रस्त्यापर्यंत नेल्याने तेथे जमलेले वाळू व्यावसायिक पळाले. एक तरुण पळताना पडला तसेच एका तरुणाला हटकून तंबी दिल्याचेही तहसीलदारांनी सांगितले.
कवठी, सरंबळला झोपडय़ा तोडल्या
बेकायदा वाळू उपसा ही डोकेदुखी ठरली आहे. रात्री मोठय़ा प्रमाणावर वाळू उपसा होतो. वाळू उपसा करणाऱया कामगारांनी बेकायदा झोपडय़ा बांधून मुक्काम केला आहे. कवठी व सरंबळातील झोपडय़ा आपण जाळून नष्ट केल्याचे तहसीलदारांनी सांगितले.
वाळू नदीत ओतण्यास भाग पाडले
दहा दिवसांपूर्वी सरंबळ-नेरुरपार भागात रात्री वाळू उपसा होत असल्याने आपण सहकाऱयांसह तेथे गेलो. रात्रभर तेथे थांबलो. मोटारसायकलवरून आलेले ‘खबरे’ आमच्या पाठिशी होते. आपण तेथे थांबल्याने उपसा केलेली वाळू किनाऱयावर आणणे त्यांना शक्य नव्हते. अखेर त्यांनी मालवण तालुका किनारपट्टी गाठली. नंतर मंडळ अधिकारी व सहकाऱयांना मालवणच्या नदी किनारी पाठविले. तेथेही वाळू किनाऱयावर आणणे शक्य न झाल्याने अखेर ती वाळू होडीतून नदीत टाकण्यास आपण भाग पाडल्याचे नाचणकर यांनी सांगितले.
पोलिसांची भूमिका संशयास्पद
रविवारी अपघात झाल्यानंतर पोलीस ठाण्यात मोठय़ा प्रमाणावर वाळू व्यावसायिक जमले. तसेच पिंगुळी ग्रामस्थही आले होते. प्रथम चिरे उतरून डंपर जात असताना घटना घडल्याची फिर्याद दिली गेली. प्रत्यक्ष वाळू भरून डंपर जात असताना पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केला. दीड-दोनशे ग्रामस्थ पोलीस ठाण्यासमोर जमलेले असताना इतरवेळी त्यांना येथे थांबू नका, सांगणारे पोलीस काल कुठे दिसले नाहीत.
पाच लाख रु. मदत देण्यास असमर्थता
मयत संतोष सावंत या कामगाराच्या कुटुंबियांना पाच लाख रुपये मदत द्या. मालकाला येथे आणा. मदत देण्याबाबत बोलण्यास सांगा, अशी भूमिका पिंगुळी ग्रामस्थांनी घेतली. मात्र, अशी कोणतीही रक्कम देण्यात आली नाही.
महसूल यंत्रणेच्या मागून फिरतात वाळू व्यावसायिक!
आपण घरी जाण्यास किंवा नदी किनारी पाहाणी करण्यास निघालो की, वाळू व्यावसायिकांची चारचाकी, दुचाकी वाहने आपल्या वाहनाच्या पुढे व मागे असतात. तसेच अन्य पथकांचाही पाठलाग केला जातो, असे तहसीलदार नाचणकर यांनी सांगितले. आपण जेथे जाऊ तेथे ते हजर असतात. आमच्या येण्याची माहिती बेकायदा वाळू वाहतूक करणारे डंपर, बेकायदा वाळू उपसा करणाऱया होडय़ा चालकांना देऊन सावध केले जाते, असेही ते म्हणाले. कुडाळ तहसील कार्यालय, कॉलेज चौक, निवासस्थान, एमआयडीसी, नेरुरपार चौक येथे वाहने उभी करून महसूल यंत्रणेच्या हालचालीवर लक्ष ठेवला जातो, असे तहसीलदार म्हणाले.