दुभाजकावर पथदीप-रिफ्लेक्टर बसविण्यात आले नसल्याने परिणाम
प्रतिनिधी /बेळगाव
सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे विविध रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले आहे. याअंतर्गत हिंडलगा येथील बॉक्साईट रोडसह गावामधून जाणाऱया बेळगाव-वेंगुर्ला रोडचे रूंदीकरण करून दुभाजक घालण्यात आले आहेत. मात्र दुभाजकावर पथदीप किंवा रिफ्लेक्टर बसविण्यात आले नाहीत. परिणामी रात्रीच्यावेळी हिंडलगा गावाच्या प्रवेशद्वारावर अपघात घडत आहेत.
वाहनधारकांच्या सोयीसाठी राज्य शासनाच्या विकास निधीमधून शहर आणि शहराला जोडणाऱया रस्त्यांचे रूंदीकरण करून डांबरीकरण करण्याची मोहीम सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने राबविण्यात आली आहे. शहराअतंर्गत रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र शहरात येणाऱया वाहनधारकांना अरुंद रस्त्यामुळे वाहतूक कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यामुळे शहराला जोडणाऱया रस्त्यांचे रूंदीकरण करण्यात आले आहे. हिंडलगा येथील फॉरेस्ट नाका ते पाईपलाई&न रोडपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे करण्यात आले आहे. याअंतर्गत रस्त्याचे रुंदीकरण शंभर फूट करण्यात आले असून मध्यभागी दुभाजक घालण्यात आले आहेत.
रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य
मात्र याठिकाणी पथदीप बसविण्यात किंवा रिफ्लेक्टर बसविण्यात आले नसल्याने रस्त्यावर अंधाराचे साम्राज्य पसरत आहे. रस्त्याचे रुंदीकरण संपल्यानंतर अरूंद रस्ता आहे. अरुंद रस्त्यावरून येणाऱया वाहनधारकांना दुभाजक असल्याची बाब लक्षात येत नाही. यामुळे दुभाजकाला ठोकरून अपघात होण्याचे प्रकार दररोज घडत आहेत.
यामुळे परिसरात किरकोळ अपघातांची मालिका सुरू आहे. याठिकाणी पथदीप बसविण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे आणि ग्राम पंचायतीकडे केली होती. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. यामुळे रुंदीकरण करण्यात आलेल्या रस्ता नागरिकांसाठी जीवघेणा बनला आहे. गावातील दोन्ही प्रवेशद्वारावरील दुभाजकावर पथदीप किंवा रिफ्लेक्टर बसविण्याची मागणी नागरिक करीत आहेत.