आज 10 नोव्हेंबरला आयोजन, संयुक्तरित्या धोरण ठरविले जाणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी आयोजित केलेल्या अफगाणिस्तान परिषदेला रशिया आणि मध्य आशियातील देशांच्या प्रतिनिधींनी येण्यास होकार दिला आहे. या परिषदेसाठी पाकिस्तान आणि चीनलाही आमंत्रण देण्यात आले होते. तथापि, पाकिस्तानने नकार कळविला आहे.
ही परिषद घेण्याचा निर्णय गेल्या महिन्यात घेण्यात आला होता. त्यानुसार देशांची निवड करुन त्यांना आमंत्रणपत्रे धाडण्यात आली होती. रशिया तसेच ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, कझाकस्थान, किरगिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांनी आमंत्रणाचा स्वीकार केला असून ते प्रतिनिधी पाठविणार आहेत. परिषदेत सहभागी होणाऱया सर्व देशांच्या प्रतिनिधींसाठी अजित डोभाल यांच्याकडून स्नेहभोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. ही परिषद आज मंगळवारी दिवसभर येथे चालणार असून महत्वाचे विषय चर्चिले जाणार आहेत.
सुरक्षा सल्लागार येणार
या परिषदेत सहभागी होणाऱया देशांचे प्रतिनिधित्व त्या त्या देशांचे सुरक्षा सल्लागार करणार आहेत. या सल्लागारांच्या स्वतंत्र बैठकाही अजित डोभाल यांच्याशी आयोजित करण्यात आल्या आहेत. या परिषदेत सहभागी देश संयुक्तरित्या अफगाणिस्तानसंबंधातील धोरण ठरविण्यावर भर देणार आहेत. अफगाणिस्तानला साहाय्य करायचे की नाही, आणि करायचे असल्यास कशा प्रकारे, यावरही बराच उहापोह परिषदेत होईल, असे अनुमान आहे.
पाकचा रडीचा डाव
पाकिस्तानने या परिषदेत सहभागी होण्यास नकार दिला आहे. भारतानेच अफगाणिस्तानातील स्थिती बिघडविली असल्याचा कांगावाही पाकचे सुरक्षा सल्लागार युसूफ यांनी केला. परिस्थिती बिघडविणारा देश स्वतः शांतता निर्माण करण्याचा आव आणत आहे. पाकिस्तान अशा परिषदेला जाऊ शकत नाही, अशी उद्दाम भाषाही पाकिस्तानने या परिषदेसंदर्भात केली आहे.
भारताचे चोख प्रत्युत्तर
पाकिस्तानचा नकार दुर्दैवी पण अपेक्षेप्रमाणे आहे. भारताने अनेक दशकांपासून अफगाणिस्तानात शांततेसाठी प्रयत्न केले आहेत. भारताने त्या देशाच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. भारताला खेळ बिघडविणारा देश असे संबोधणे स्वार्थी आणि मतलबीपणाचे आहे. मात्र, मध्य आशियातील देशांनी परिषदेला येण्याचे मान्य पेले असून परिषद यशस्वीरित्या पार पडेल, असा विश्वास भारताच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे.
परिषदेचा कार्यक्रम विस्तृत
परिषदेत अफगाणिस्तानातील दहशतवाद, तेथून विविध गटांच्या माध्यमातून इतर देशांमध्ये पसरणारा अतिरेक, अफगाणिस्तानातून बेकायदा निर्यात होणारे अंमली पदार्थ, तेथील स्थलांतरित, तसेच त्या देशातील जनतेशी संवाद अशा विविध विषयांवर चर्चा होणार आहे. सर्व देश संयुक्त धोरण ठरविण्यासाठी चर्चा करणार आहेत. सध्या अफगाणिस्तानात मोठय़ा प्रमाणात दुष्काळ, अन्नधान्याचा तुटवडा आदी संकटे आहेत. त्या देशाची अर्थव्यवस्था पूर्णतः ढासळली असून तेथील सामाजिक स्थिती कोलमडली आहे. अशावेळी या देशाचे शेजारी देश काय करु शकतील याची चाचपणी या परिषदेत केली जाणार आहे.
ऐतिहासिक परिषद
ड ही परिषद सर्व अर्थाने ऐतिहासिक, भारतात आयोजन प्रथमच
ड पाकिस्तानकडून मोडता घालण्याचा प्रयत्न, उलटा कांगावा
ड रशियाचा भारताला पाठिंबा, संयुक्त धोरण ठरविले जाणार