काबुल \ ऑनलाईन टीम
अफगाणिस्तान आणि तालिबानमध्ये सध्या मोठा संघर्ष सुरू आहे. काल, रविवारी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या चहूबाजूला वेढा घातला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देश सोडून ते ओमान येथील अमेरिकन एअरबेसवर राहण्यास गेले आहेत. लवकरच ते अमेरिकेत जातील असे सांगितले जात आहे. पण राष्ट्राध्यक्षांनी देश सोडल्यानंतर रात्री उशीरा एक भावनिक पोस्ट करत देश सोडण्याचे कारण स्पष्ट केले आहे.
राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की, जर अफगाणिस्तानात राहिलो असतो तर मोठ्या संख्येने लोकं देशासाठी लढायला आले असते. अशा परिस्थितीत असंख्य लोकांचा मृत्यू झाला असता. तसेच काबुल शहर पूर्णपणे उद्धवस्त झाले असते. म्हणून मला देश सोडण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. आता तालिबान जिंकला आहे. त्यामुळे आता अफगाण लोकांचा सन्मान, संपत्ती आणि सुरक्षेसाठी तो जबाबदार आहे. एका ऐतिहासिक परीक्षेचा तालिबान सामना करत आहे. आता एकतर तो अफगाणिस्तानचे नाव आणि सन्मान वाचवेल किंवा इतर ठिकाणांना आणि नेटवर्कला प्राधान्य देईल, अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली आहे.
मात्र, अशरफ घनी यांनी आपल्या पोस्टमध्ये ते सध्या कुठे आहेत हे सांगितले नाही. अफगाणिस्तानातील टोलो न्यूजच्या मते, घनी ताजिकिस्तानला गेले आहेत. शांती प्रक्रियेचे प्रमुख अब्दुल्ला-अब्दुल्ला यांनी अफगाणिस्तानला या स्थितीत आणण्यासाठी अश्रफ घनी यांना दोषी ठरवले. दरम्यान, अफगाणिस्तानमधील परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. त्याचबरोबर काबूल विमानतळावरून उड्डाणे बंद करण्यात आली आहेत.
तालिबानी बंडखोरांनी रविवारी काबूलमध्ये प्रवेश केला. मात्र ते शहराच्या मध्यभागाबाहेरच थांबले. दरम्यान, काही काळ काबूलच्या सीमेवर घालवल्यानंतर रविवार रात्री आपण या शहराच्या अंतर्भागात प्रवेश करू, असे तालिबानने सांगितले होते. तालिबानने काबूलवर ताबा मिळवल्याने आता अफगाणिस्तान प्रशासनाच्या हाती फारसे काही उरलेले नाही.