प्रतिनिधी/ कोल्हापूर
ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन झाले. हृदयविकाराच्या झटक्याने अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे पुत्र अभिनेता अजिंक्य देव यांनी याबाबतची माहिती दिली. एका ज्येष्ठ अभिनेत्याचे निधन झाल्याने संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
रमेश देव यांनी संपूर्ण हयात ही सिनेसृष्टीला दिली. त्यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत असंख्य मराठी आणि हिंदी सिनेमात भूमिका वठवली. त्यांच्या पत्नी सीमा देवही प्रसिद्ध सिनेअभिनेत्री असून मुलगा अजिंक्य देव अभिनेता तर दुसरा मुलगा अभिनव हा दिग्दर्शक आहे. आनंदसारख्या प्रसिद्ध चित्रपटासह शेकडो चित्रपट रमेश देव यांनी केले आहेत.
रमेश देव यांचा जन्म 30 जानेवारी 1926 रोजी झाला. त्यांनी आपल्या दीर्घकारकिर्दीत 285 हून अधिक हिंदी चित्रपट, 190 मराठी चित्रपट आणि 30 मराठी नाटकांमध्ये 200 हून अधिक प्रयोग केले. त्यांनी फीचर फिल्म्स, टेलिव्हिजन मालिका आणि 250 हून अधिक जाहिरात चित्रपटांची निर्मितीदेखील केली. त्यांनी अनेक चित्रपट, माहितीपट आणि दूरदर्शन मालिकादेखील दिग्दर्शित केल्या. त्यांच्या कार्यासाठी त्यांना अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
1951 मध्ये त्यांनी मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. राजा परांजपे दिग्दर्शित आंधळा मागतोय एक डोळा या मराठी चित्रपटाद्वारे रमेश देव यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. राजश्री प्रॉडक्शनचा आरती हा त्यांचा पहिला हिंदी चित्रपट होता.