राजकीय नेते सीमान यांनी प्रवृत्त केल्याचा आरोप : उपचार सुरू
वृत्तसंस्था/ चेन्नई
तमिळ आणि मल्याळम चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री विजयालक्ष्मीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याने तिला चेन्नईच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नाम तमिलार पक्ष आणि त्याचे नेते सीमान यांच्या अनुयायांकडून चारित्र्यावर चिखलफेक झाल्याने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा दावा अभिनेत्रीने केला आहे. राजकीय नेते हरि नाडर यांनीही आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तिने केला आहे.
अभिनेत्रीने आत्महत्येच्या प्रयत्नापूर्वी रविवारी संध्याकाळी सुमारे 4 वाजता फेसबुकवर एक चित्रफित प्रसारित केली होती. “ही माझी अंतिम चित्रफित असून माझ्या प्रिय मित्रांनो आणि हितचिंतकांनो तुमचा निरोप घेते’ असे तिने यात म्हटले होते. मागील चार महिन्यांपासून सीमान आणि त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे प्रचंड तणावाखाली आहे. याचबरोबर हरि नाडर यांच्याकडून मला अपमानित करण्यात आले. मी रक्तदाबाच्या गोळय़ा घेतल्या असून काही वेळातच मी मरून जाईन असे विजयालक्ष्मीने म्हटले होते.
सीमान यांनी मी कर्नाटकात जन्मल्यानेच छळ केला आहे. . सीमान सातत्याने समाजमाध्यमांवर माझा छळ करत असल्याचा आरोप तिने चित्रफितीत केला होता.
विजयालक्ष्मी मागील काही वर्षांपासून चेन्नईत राहत आहे. कथितरित्या 2006 मध्येही तिने झोपेच्या गोळय़ांचे अतिसेवन करत आत्महत्येचा प्रयत्न केला होता. विवाह करू पाहणाऱया एका सहाय्यक दिग्दर्शकाच्या त्रासामुळे त्यावेळी तिने हे पाऊल उचलले होते.
विजयालक्ष्मीने 2008 मध्ये आर. माधवन याच्यासोबत ‘वाज्तुगल’ हा तमिळ चित्रपट केला होता. तर 2003 मध्ये सत्यराजसोबत ‘रामचंद्र’ आणि कन्नडमध्ये मोहनलाल यांच्यासोबत 2000 मध्ये ‘देवदूतम’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. 2017 मध्ये तिचा ‘मीसाया मुरुक्कू’ हा अखेरचा तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर 2018 च्या ‘फाइट’ या कन्नड चित्रपटात ती दिसून आली होती.