अर्जुन पुरस्कारासाठी बोर्घोहेन, सिमरनजीत, मनीष रिंगणात,भारतीय मुष्टियुद्ध संघटनेकडून नामांकन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
विश्व ग्नरौप्यविजेता अमित पांघल व अनुभवी विकास कृष्णन यांची भारतीय मुष्टियुद्ध फेडरेशनने प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली. ऑलिम्पिकशी संलग्न मुष्टियोद्धय़ांचाच खेलरत्न पुरस्कारासाठी नामांकन करण्याचा त्यांनी येथे निर्णय घेतला.
भारतीय मुष्टियुद्ध संघटनेने याशिवाय, विश्व कांस्यजेते त्रिकुट लवलिना बोर्घोहेन (69 किलोग्रॅम), सिमरनजीत कौर (64 किलोग्रॅम) व मनीष कौशिक (63 किलोग्रॅम) यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. यापैकी बोर्घोहेनने दोनवेळा ऑलिम्पिक कांस्य जिंकले आहे. यातील एक पदक तिने गतवर्षी जिंकले. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी फेडरेशनने राष्ट्रीय महिला संघाचे प्रशिक्षक मोहम्मद अली कमर व सहाय्यक प्रशिक्षक छोटे लाल यादव यांचे नामांकन पाठवले आहे. सर्व ऍथलिट व प्रशिक्षकांचे नामांकन त्यांच्या मागील चार वर्षाच्या कालावधीतील कामगिरीवरुन ठरवले असल्याचे मुष्टियुद्ध संघटनेने येथे नमूद केले.
पांघलला पुरस्काराची अपेक्षा
24 वर्षीय पांघल (52 किलोग्रॅम वजनगट) हा आशियाई चॅम्पियन देखील असून त्याला आजवर कोणताही राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मिळालेला नाही. मागील तीन वर्षांकरिता त्याची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली गेली होती. पण, 2012 मध्ये तो उत्तेजक चाचणीत दोषी आढळल्याने निवड समितीने त्याचा विचार केला नव्हता. कांजण्यावर उपचार करुन घेत असताना जी औषधे डॉक्टरांनी दिली, ती घेतल्यानंतर तो दोषी आढळून आला होता. त्या औषधात उत्तेजक प्रतिबंधक द्रव्याचा अंश असल्याचे नंतर स्पष्ट झाले.
‘वैद्यकीयदृष्टय़ा अजाणतेपणाने औषध घेतले होते, हे मी कबूल करतो. यात जाणून बुजून काहीच केले नव्हते. जी औषधे दिली गेली, ती मी परिणामांचा विचार न करता घेतली. यंदा पुरस्कारासाठी माझा विचार होईल, अशी अपेक्षा आहे’, असे पांघल अलीकडेच वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाला होता. पुरस्कारासाठी निवड प्रक्रियेच्या पद्धतीत बदल करावा, अशी लेखी विनंतीही त्याने क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांच्याकडे केली आहे.
कौर, बोर्घोहेन ऑलिम्पिकसाठी पात्र
राष्ट्रकुल व आशियाई सुवर्णजेता कृष्णनने (69 किलोग्रॅम) 2012 मध्ये अर्जुन पुरस्कार जिंकला असून या 28 वर्षीय मुष्टियोद्धय़ाने 2018 मध्ये व्यावसायिक मुष्टियुद्धाकडे मोर्चा वळवला. याशिवाय, कौशिक देखील उत्तम बहरात राहिला असून गतवर्षी पदार्पणाच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येच कांस्य जिंकत त्याने ऑलिम्पिकसाठी पात्रता मिळवली. त्यापूर्वी 2018 राष्ट्रकुल स्पर्धेत त्याने रौप्यपदकाची कमाई देखील केली आहे. कौर व बोर्घोहेन यांनी आशियाई पात्रता जिंकत त्याचवेळी टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट निश्चित केले आहे.
अर्जुनपुरस्कार जेता कमर भारताचा मुष्टियुद्धातील पहिला राष्ट्रकुल सुवर्णजेता असून मागील वर्षभरापासून त्यांच्याकडे महिला संघाच्या प्रशिक्षणाची धुरा आहे. त्यापूर्वी एक वर्ष त्यांनी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम पाहिले आहे. छोटे लाल यादव यांनी सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन एमसी मेरी कोमला मोलाचे मार्गदर्शन केले आहे. स्वतः मेरीने त्यांच्या योगदानाचा सातत्याने उल्लेख केला आहे. याशिवाय, माजी पदकजेती एन. उषा यांची आजीवन योगदानासाठी ध्यान चंद पुरस्कारासाठी शिफारस केली गेली आहे. नामांकन दाखल करण्यासाठी यंदा 3 जून ही शेवटची तारीख आहे.
मुष्टियुद्धातील नामांकने
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : अमित पांघल, विकास कृष्णन
अर्जुन पुरस्कार : लवलिना बोर्घोहेन, सिमरनजीत कौर, मनीष कौशिक.
द्रोणाचार्य पुरस्कार : मोहम्मद अली कमर, छोटे लाल यादव.
ध्यान चंद पुरस्कार : एन. उषा.