ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन :
भारतानंतर अमेरिकेनेही चीनच्या प्रसिद्ध ‘टिकटॉक’ ॲपवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि ग्राहकांच्या डेटा चोरीचा धोका लक्षात घेता ही बंदी घालणार असल्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
एअरफोर्स वनवरील कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, देशाच्या एकात्मतेला आणि सार्वभौमत्वाला धक्का पोहचवणारी तसेच यूजर्सना असुरक्षित असलेल्या चिनी अॅपवर भारताने नुकतीच बंदी घातली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर अमेरिकेत चिनी अॅपवर बंदी घालण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अनेक खासदार आणि एजन्सींनी टिकटॉकवर हेरगिरी आणि डेटा चोरीचा आरोप केला. त्यामुळे अमेरिकेनेही टिकटॉकवर बंदी घालण्याचा निर्णय घेेतला आहे.
टीकटॉक हे राष्ट्रीय सुरक्षा आणि सेंसरशिपच्या मुद्याचा एक स्त्रोत बनले आहे. आमचे प्रशासन देखील टिकटॉकवर बंदी घालण्यासंदर्भात याचे मुल्यांकन करत आहे. एग्झिक्यूटिव्ह ऑर्डर काढून 24 तासात अमेरिकेत टिकटॉकवर बंदी घातली जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.