महिलांच्या 400 मीटर्स अडथळय़ाच्या शर्यतीत सुयश, दलिलाहला कांस्य तर फेमकेला रौप्य पदक
अमेरिकेच्या सिडनी मॅकलॉघ्लिनने 400 मीटर्स अडथळय़ाच्या शर्यतीत 51.46 सेकंदांचा नवा विश्वविक्रम रचत सुवर्णपदकाची कमाई केली. या गटात अमेरिकेने सुवर्ण व रौप्य अशी दोन पदके काबीज केली. दलिलाह मुहम्मद 51.58 सेकंद वेळेसह दुसऱया स्थानी आली. नेदरलँड्सच्या फेमकेने 52.03 सेकंद वेळेत हा इव्हेंट पूर्ण करत कांस्यपदकाची कमाई केली.
21 वर्षीय सिडनीने जूनमध्ये अमेरिकन ट्रायल्समध्ये प्रस्थापित केलेला 51.90 सेकंदांचा आपलाच विक्रम येथे मोडीत काढला. 2019 वर्ल्ड चॅम्पियनशिप व 2016 ऑलिम्पिक चॅम्पियन ठरलेल्या दलिलाह पूर्ण अनुभव पणाला लावून धावली. मात्र, अव्वलस्थानापासून ती किंचीत दूर राहिली.
‘आजची रेस अतिशय लक्षवेधी होती. या रेसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करता आले, देशाला सुवर्ण जिंकून देता आले, याचा मला विशेष अभिमान आहे. एकवेळ दलिलाह आपल्याला पिछाडीवर टाकू शकते, असे वाटले होते. त्यावेळी मी शक्य तितक्या वेगाने धावणे अधिक पसंत केले आणि हीच रणनीती फलद्रूप ठरली’, असे सुवर्णजेती सिडनी येथे म्हणाली.
‘माझ्या दृष्टीने सातव्या हर्डलपर्यंत या शर्यतीला सुरुवात देखील झाली नव्हती. त्यानंतर सर्वस्व पणाला लावून धावणे, हे एकच ध्येय मी माझ्यासमोर ठेवले होते’, याचा तिने पुढे उल्लेख केला. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये मॅकलॉघ्लिन व मुहम्मद यांच्यातील जुगलबंदीची विशेष प्रतीक्षा होती. मॅकलॉघ्लिन यापूर्वी 2016 ऑलिम्पिक फायनलसाठी पात्र ठरु शकली नव्हती. मात्र, इथे टोकियोत तिने सुवर्णपदक जिंकत सारी कसर भरुन काढली.