भारतातील बहुतेक बुद्धिवंत विद्यार्थ्यांना अमेरिकेला जाऊन करिअर करण्याचे वेड असते. संधी मिळताच भारतात शिक्षण पूर्ण करून ते अमेरिकेला पळतात आणि तेथेच स्थायिक होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असतात. तथापि, आयआयटी कानपूरमधून इंजिनियर झालेले किशोर इंदुकुरी यांनी अमेरिकेतले लठ्ठ पगाराचे काम सोडून भारतात परत येऊन दुधाची डेअरी टाकली आहे. नऊ वर्षांत त्यांच्या या व्यवसायाची उलाढाल 44 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे.
आयआयटी कानपूरमधून पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेला गेले. तेथे मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आणि डॉक्टरेटही मिळविली. साहजिकच अमेरिकेतच त्यांना इंटेल या जगप्रसिद्ध कंपनीत मोठय़ा वेतनाची नोकरीही मिळाली. पण भारतात येऊन भारतासाठी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याची त्यांची संकल्पना त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यामुळे काही वर्षे अमेरिकेत नोकरी करून गाठीला पैसा लावून ते भारतात परतले.
हैद्राबादनजीक त्यांनी 20 गायींपासून दूध व्यवसाय सुरू केला. तत्पूर्वी या व्यवसायाचा सांगोपांग अभ्यासही केला. त्यांच्यासमोर दोन-तीन व्यवसायांचे पर्याय होते. तथापि, भारतातील दुधाची वाढती गरज, बाजारपेठेची उपलब्धता आणि नफ्याचे प्रमाण लक्षात घेऊन त्यांनी या व्यवसायाची निवड केली. त्यांना या व्यवसायाचा पूर्वी कोणताही अनुभव नव्हता. त्यामुळे सुरुवातीचा काळ अतिशय कठीण गेला. तथापि, प्रयत्नशीलता आणि धीरोदात्तपणा यांच्या जोरावर त्यांनी अडचणींवर मात करून क्यवसाय मोठय़ा प्रमाणावर वाढविला आहे. आता त्यांच्याकडे मोठय़ा संख्येने गायी व म्हशी असून ते दुधापासून तूप, लोणी, चीज, पनीर, ताक इत्यादी नित्योपयोगी पदार्थ तयार करतात. गुणवत्ता उत्तम असल्याने त्यांच्या उत्पादनांना मागणीही भरपूर असते. त्यांनी एक आदर्शच घालून दिला आहे जो इतरांसाठीही उपयुक्त आहे, असे त्यांच्याबद्दल बोलले जाते.