अत्यंत वेगळे आहे वेडिंग मेन्यूचे स्वरुप
विवाहसोहळा हा भव्य तसेच स्मरणीय असायला हवा. याचमुळे अनेक लोक विवाहाकरता पाण्यासारखा पैसा खर्च करतात. सोशल मीडियावर बंगाली विवाहसोहळय़ातील एक अनोखी आयडिया व्हायरल झाली आहे. तुम्ही विवाहांमध्ये अनेक प्रकारचे वेडिंग कार्ड्स पाहिले असाल, परंतु येथे विवाहाचे मेन्यूकार्ड सादर करण्याची पद्धत पाहून प्रत्येक जण अचंबित झाला आहे.
पश्चिम बंगालच्या सिलीगुडी शहरातील ही घटना आहे. तेथे एका विवाहसोहळय़ात खाण्याचा देण्यात आलेला मेन्यू लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. या विवाहात लाकडी फूटपट्टीच्या मागील भागात जेवणात वाढल्या जाणाऱया पदार्थांची यादी छापून ती पाहुण्यांमध्ये वाटण्यात आली होती. आता याचे स्केलचे छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाले आहे.
मोजा आणि खा
छायाचित्रात 30 सेंटीमीटरचे एक लाकडी स्केल दिसून येते. ट्विर युजरने हे छायाचित्र शेअर करत बंगाली भाषेत ‘मोजा आणि खा’ असे लिहिले आहे. या क्रिएटिव्हिटीचे लोक कौतुक करत आहेत. हे मेन्यू कार्ड सुष्मिता आणि अनिमेष नावाच्या जोडप्याच्या विवाहातील आहे. त्यांचा विवाह सिलीगुडीमध्ये झाला होता. ही सर्व माहिती स्केलवर देण्यात आली आहे.
स्केलवर काय लिहिलंय?
याचबरोबर स्केलवर नोंद खाद्यपदार्थांमध्ये चिकन लॉलीपॉप, क्रिस्पी बेबी कॉर्न, कॉफी इत्यादी स्टार्टर सामील आहेत. तर मेन कोर्समध्ये पारंपरिक बंगाली खाद्यपदार्थ मटण काशा, रसगुल्ला, संदेश, फिश कालिया, फ्राइड राइस, मटण मसाला, मँगो चटणी यांची नावे आहेत.
युजर्सनी मांडली मनातील गोष्ट
या पोस्टवर अनेक युजर्सनी टिप्पणी केली आहे. जर कुणी अधिक खात असल्यास त्याला कृपया या पट्टीने मारू नका असे एकाने म्हटले आहे. तर बंगाली विवाहासाठी इनोव्हेटिव्ह स्टाइल मेन्यू! ही तुमच्या पाठीवर पडू शकते आणि तुम्ही किती जेवत आहात हे ‘मोजू’ देखील शकते असे दुसऱया युजरने लिहिले आहे.