वृत्तसंस्था/तेहरान
इराणचे माजी राष्ट्रपती महमूद अहमदीनेजाद जून महिन्यात होणाऱया या पदाच्या निवडणुकीत पुन्हा उतरणार आहेत. अहमदीनेजाद यांनी स्वतःच्या समर्थकांसह गृह मंत्रालयातील नोंदणीकरण केंद्रात जात राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी स्वतःचा नोंदणी अर्ज भरला आहे.
अहमदीनेजाद यांनी अलिकडच्या वर्षांमध्ये स्वतःच्या कट्टरतावादी प्रतिमेला अधिक मध्यममार्गाच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच खराब व्यवस्थापनासाठी त्यांनी सरकारवर टीका केली आहे.
2017 मध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांनी त्यांच्यावर राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सामील होण्यास बंदी घातली होती. पण तेव्हा त्यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. कुठल्याही उमेदवाराला विरोध करणार नसल्याचे खामेनेई यांनी यावेळी म्हटले आहे. पण तरीही निवडणूक परिषद अहमदीनेजाद यांच्या उमेदवारीला रोखू शकते.
राजकीय पटलावर अहमदीनेजाद यांचे पुनरागमन झाल्यास पाश्चिमात्य, विशेषकरून इस्रायल आणि अमेरिकेच्या विरोधात कठोर भूमिका इच्छिणाऱया कट्टरतावाद्यांचा उत्साह वाढू शकतो. विद्यमान राष्ट्रपती हसन रुहानी हे कार्यकाळांच्या मर्यादेमुळे पुन्हा निवडणूक लढवू शकत नाहीत.