ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये 30 टक्के घसरण झाली आहे. सौदी अरेबियाने रशियाला कोंडीत पकडण्यासाठी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवून किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती अजून पडण्याची शक्यता आहे.
जगभरात तेल उत्पादन कमी करण्यासंदर्भात ओपेक आणि रशियामध्ये एकमत होऊ शकले नाही. तसेच तेल निर्यातदार देशांची संघटना आणि इतर मित्र देशांमध्ये तेल उत्पादनात कपात करण्यासंबंधी कोणताही करार होऊ शकला नाही. त्यातच रशिया आणि सौदी अरेबियामधील शीतयुद्ध पेटले आहे. त्यामुळे 1991 नंतर कच्च्या तेलाच्या किमतीतली ही सर्वात मोठी कपात झाली आहे. जागतिक बाजारात तेलाच्या दरात घसरण होत असल्यामुळे भारतासह इतर देशांना याचा फायदा होणार आहे.
आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड फ्यूचर 14.25 डॉलर म्हणजेच 31.5 घसरून 31.02 डॉलर प्रतिबॅरलवर आला आहे. सध्या 0114 जीएमटी वर 35.75 डॉलर प्रति बॅरल टेड सुरू आहे. अमेरिकेच्या वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूडच्या किंमती 11.28 डॉलर म्हणजेच 27.4 टक्क्मयांनी घसरून 30 डॉलर प्रतिबॅरलवर आल्या आहेत.
जागतिक बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्याने भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होत आहेत. सलग चौथ्या दिवशी पेट्रोल 24 पैशांनी तर डिझेल 26 पैशांनी स्वस्त झाले आहे. मुंबईत डिझेल प्रति लिटर 66.24 रुपये तर पेट्रोल 76.29 रुपये आहे.