मस्की, बसवकल्याण, बेळगावात नेतेमंडळी करणार पोटनिवडणुकीचा प्रचार : सर्वच पक्षांकडून जोरदार प्रयत्न : 17 एप्रिलला मतदान
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यात पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले असून मस्की, बसवकल्याण या दोन विधानसभा तर बेळगाव लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. शनिवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. आता खऱयाअर्थाने पोटनिवडणुकीला जोर येणार असून प्रचाराचा धडाका सुरू आहे. सोमवारपासून या तिन्ही मतदासंघांमध्ये आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी नेतेमंडळी प्रचार करणार आहेत. कोरोनाकाळात होणाऱया या तिन्ही पोटनिवडणुकीत भाजप, काँग्रेस, निजद या प्रमुख पक्षातील वरिष्ठ नेतमंडळी व कार्यकर्त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विजयासाठी प्रतिष्ठा पणाला लावली असून सोमवारपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत. मुख्यमंत्री येडियुराप्पा या आठवडय़ात तिन्ही मतदारसंघात पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बेळगाव लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. बेळगाव लोकसभा निवडणुकीत चारवेळा पराभव पत्कारावा लागल्यानंतर या पोटनिवडणुकीत बेळगाव मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. त्यानुसार काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांना उमेदवारी दिली असून सोमवारपासून पक्षातील वरिष्ठ नेतेमंडळी त्यांच्या प्रचारासाठी बेळगावाला येणार आहेत. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी सतीश जारकीहोळी यांचा अर्ज भरण्यासाठी उपस्थित होते. तर भाजपने आपल्या पूर्ण ताकदीनिशी उतरून बेळगाव लोकसभा आपल्याकडेच कायम ठेवण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यांच्या विजयासाठी पक्षातील नेतेमंडळी बेळगावात तळ ठोकणार असून मंत्री जगदीश शेट्टर यांनी मंगला अंगडीच्या यांच्या प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
बेळगाव व बसवकल्याण उमेदवारांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. मात्र, मुख्यमंत्री येडियुराप्पा हे कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करतील, असा विश्वास उमेदवारांना आहे. निजदतर्फे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्यासह पक्षातील नेतेमंडळी बसवकल्याणमध्ये तळ ठोकणार आहेत. एकंदरीत या पोटनिवडणुकीत राज्यातील सत्ताधारी व विरोधी पक्षांमध्ये जोरदार चुरस पहावयास मिळणार आहे. मात्र, नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करूनच वरिष्ठ नेतेमंडळींना पुढील वाटचाल करावी लागणार आहे. या पोटनिवडणुकीबाबत मोठे कुतूहल निर्माण झाले आहे. बेळगाव लोकसभा, मस्की व बसवकल्याण विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 17 एप्रिलला मतदान होणार असून 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
मार्गसूचीचे पालन करण्यात लोकप्रतिनिधीच मागे
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट पसरली असून रुग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोरोना मार्गसूचीचे पालन करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. मात्र, कोरोना मार्गसूचीचे पालन करण्यात लोकप्रतिनिधीच मागे पडत असल्याचे पहावयास मिळत आहे. मस्की, बसवकल्याण व बेळगाव पोटनिवडणुकीच्या प्रचारावेळी राज्यातील प्रमुख पक्षांकडूनच कोरोना मार्गसूचीचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.