राज्य सरकारकडून निर्बंध शिथिल : जीम, स्विमिंग पूलनाही सूट दिल्याने मालकांना दिलासा
प्रतिनिधी /बेंगळूर
कर्नाटक राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने राज्य सरकारने चित्रपटगृहे, स्विमिंग पूल आणि जीमसाठी घातलेले निर्बंध मागे घेतले आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूर्ण क्षमतेने लोकांना प्रवेश देता येणार आहे. शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या कोरोना आढावा बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपटगृहे, स्विमिंग पूल आणि जीम मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने 4 जानेवारी रोजी नवी मार्गसूची जारी करून चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, जीमवर क्षमतेच्या 50 टक्के जणांनाच प्रवेश देण्याची अट घातली होती.
उर्वरित सभा-समारंभ, विवाह कार्यक्रमांसाठी सध्या लागू असलेले कोणतेही नियम शिथिल करण्यात आलेले नाहीत. आंदोलन, निदर्शने, मोर्चावरही निर्बंध राहणार आहे. राज्य सरकारने मागील आठवडय़ापासून नाईट कर्फ्यू रद्द केला होता. दरम्यान, चित्रपटगृह मालक आणि कन्नड फिल्म इंडस्ट्रीतील अनेकांनी राज्य सरकारवर दबाव आणून निर्बंध हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळे या मागणीची दखल घेण्यात आली आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडलेल्या बैठकीनंतर आरोग्य आणि कुटुंब कल्याणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी निर्णयांची माहिती पत्रकारांशी बोलताना दिली.
शनिवारपासूनच नवे नियम जारी होतील. चित्रपटगृहे, स्विमिंग पूल आणि जीमसाठी 50 टक्के प्रवेशासंबंधी असणारा नियम मागे घेण्यात आला आहे. येथे येणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत. शिवाय इतर सुरक्षा नियमांचे पालन करावे. राज्य सरकारने जारी केलेल्या मार्गसूचीचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित चित्रपटगृहे, स्विमिंग पूल आणि जीम मालकांचीही असणार आहे. या तिन्ही आस्थापनांना परवानगी देणाऱया संबंधित खात्याच्या अधिकाऱयांनी नियमित आणि अनपेक्षितपणे भेटी देऊन कोविड मार्गसूचीचे पालन होत आहे का, याची पाहणी करावी, अशी सूचना देण्यात आल्याचे ते म्हणाले.
चित्रपटगृहांमधील प्रेक्षकांसाठी…
चित्रपटगृहांमध्ये पूर्ण क्षमतेने प्रेक्षकांना प्रवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून शनिवारपासूनच याची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे चित्रपटगृहांचे मालक आणि चित्रपट निर्माते, कलाकारांनी समाधान व्यक्त केले आहे. चित्रपटगृहात जाणाऱयांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत, प्रत्येकाने सक्तीने मास्क परिधान करावा. चित्रपटगृहात शितपेय, खाद्यपदार्थ घेऊन जाता येणार नाहीत. मध्यांतरावेळी बाहेर येऊन खाद्यपदार्थ खाण्याची मुभा असणार आहे.