जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत थंडी राहणार
प्रतिनिधी / कुडाळ:
सिंधुदुर्ग जिल्हय़ात गेल्या चार-पाच दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली असून डिसेंबरअखेर व जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ातही थंडी कायम राहणार आहे. डिसेंबरअखेरपर्यंत किमान तापमान आणखीन घटण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभाग, प्रादेशिक हवामान शास्त्र केंद्र (कुलाबा-मुंबई) यांच्याकडून सांख्यिकीय हवामान मापदंडाच्या हवामान अंदाज मॉडेलवर आधारित प्राप्त झालेल्या हवामान अंदाजावर जिल्हय़ात थंडी वाढणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
हवामान विभागाने गेल्या आठवडय़ात थंडीची लाट उत्तर-पश्चिम भारतात येणार असल्याचे जाहीर पेले होते. आता पुढील आठवडय़ात म्हणजे 25 पासून पूर्वेकडील राज्यात ही लाट पसरणार असल्याचे सूतोवाच केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ात 17 डिसेंबरपासून थंडीला सुरवात झाली असून गेल्या चार-पाच दिवसांपासून कडाक्याची थंडी आहे. दिवसा 17 ते 18 अंश सेल्सियस किमान तापमान असते. मात्र, सकाळी 13 ते 14 अंश सेल्सियस एवढे किमान तापमान असते. त्यामुळे मध्यरात्रीनंतर थंडी वाढत आहे.
25 ते 29 डिसेंबर या दरम्यान पहिले दोन दिवस किमान तापमान 18 अंश सेल्सियस, तर त्यानंतर 27 ते 29 डिसेंबरपर्यंत 17 अंश सेल्सियस किमान तापमान राहणार असल्याने या आठवडय़ात थंडी अधिक वाढण्याची शक्यता आहे. जानेवारी 2021 च्या पहिल्या आठवडय़ात किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सियस राहिल. मात्र, कमाल तापमान 29 ते 30 अंश सेल्सियस असे वाढणार आहे. पुढच्या आठवडय़ातही थंडी राहणार आहे. देश पातळीवर थंडी वाढल्यास सिंधुदुर्गातही कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवडय़ात मात्र पावसाची कोणतीही शक्यता नाही.
आंबा-काजू पिकांना पोषक
सिंधुदुर्गात सध्या असलेली थंडी आंबा पिकासह अन्य पिकांना पोषक आहे, असे मुळदे येथील उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्रा. यशवंत मुठाळ यांनी सांगितले. सिंधुदुर्गात येत्या पंधरा दिवसांत थंडी असणार आहे. त्याचा फायदा फळ व अन्य उत्पादनाला होणार असल्याचे ते म्हणाले.