ऑनलाईन टीम/तरुण भारत
राजधानी दिल्लीमध्ये प्रजासत्ताक दिनाची तयारी सुरू आहे. कोरोनाच्या निर्बंधांमध्ये यावर्षीही हा दिन साजरा होणार आहे. प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या सोहळ्यामध्ये दिल्लीच्या इंडिया गेटमध्ये (India Gate) असलेल्या वीर जवानांच्या आठवणरूपी अमर जवान ज्योतीलाही अनन्यसाधारण महत्त्व आहे. खरं तर ही ज्योतच इंडिया गेटची ओळख मानली जाते. पण आता मात्र ही ओळख बदलणार आहे. आता अमर जवान ज्योती इंडिया गेटवर नाही, तर राष्ट्रीय युद्ध स्मारकात प्रज्ज्वलित केली जाणार आहे.
दरम्यान, शुक्रवारी दुपारी होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये इंडिया गेट जवळच्या अमर जवान ज्योतीमधील आग ही राष्ट्रीय युद्ध स्मारकामध्ये तेवत ठेवलेल्या स्मारकापर्यंत आणली जाणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवरील ज्वाला विझवण्यात येणार असल्याचा दावा केला जात असला तरी ही ज्योती तेवत ठेवली जाणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलंय. इंडिया गेटजवळ असणारं राष्ट्रीय युद्ध स्मारक हे ४० एकरांवर पसरलेलं आहे. या युद्ध स्मारकामध्ये स्वतंत्र भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांचं नाव कोरलेलं आहे. येथे एक राष्ट्रीय युद्ध संग्रहालयही आहे.