2 नोव्हेंबरपासून स्पाईस जेट देणार विमानसेवा : प्रवाशांनाही बुकिंग करणे ठरणार सोयीचे
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-दिल्ली या विमानफेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने आठवडय़ातून तीन दिवस विमानफेरी उपलब्ध झाली आहे. याचबरोबर स्पाईस जेट कंपनीने अधिक आसन क्षमता असणाऱया बोईंग विमानाची व्यवस्था केली आहे. येत्या दोन नोव्हेंबरपासून 189 आसन क्षमता असणारी बोईंग विमानसेवा सुरू होणार आहे.
13 ऑगस्टपासून सुरू झालेल्या बेळगाव-दिल्ली विमानफेरीला उत्तम प्रतिसाद मिळू लागला आहे. दररोज 90 ते 100 टक्के बुकिंग होत आहे. बेळगावमधून लष्करी जवान, राजकारणी, विद्यार्थी, उद्योजक, व्यापारी यांचा या विमानाला प्रतिसाद मिळू लागल्याने स्पाईस जेट कंपनीने ऑक्टोबर महिन्यापासून आठवडय़ाला तीन दिवस विमानफेरी सुरू केली. यापूर्वी सोमवार व शुक्रवार असे दोन दिवस विमानफेरी उपलब्ध होती. आता यामध्ये गुरुवारचीदेखील भर पडली आहे.
प्रवाशांसाठी आसन क्षमतेत वाढ
सर्वसाधारणपणे बेळगाव विमानतळावरून 50 ते 70 आसन क्षमता असणारी विमाने उड्डाण घेतात. परंतु बेळगाव-दिल्ली ही सेवा देणाऱया स्पाईस जेट विमान कंपनीने 149 आसन क्षमता असणारे बोईंग विमान ऑगस्टमध्ये सुरू केले होते. या विमानाचे बुकिंग 100 टक्के होत असल्याने अधिक आसन क्षमता असणाऱया विमानाची सोय स्पाईस जेटने केली आहे. 2 नोव्हेंबरपासून 189 आसन क्षमता असणारे बोईंग विमान उतरणार आहे. यामुळे प्रवाशांनाही बुकिंग करणे सोयीचे ठरणार आहे.
वेळापत्रकातही होणार बदल…
यापूर्वी दिल्ली-बेळगाव-दिल्ली ही विमानफेरी दुपारनंतर होती. परंतु प्रवाशांच्या आग्रहाखातर आता सकाळच्या सत्रात विमानफेरी सुरू केली जाणार आहे. सकाळी 7 वाजता दिल्ली येथून निघालेले विमान 9.20 वा. बेळगावला पोहोचणार आहे. तर सकाळी 10 वा. बेळगाव येथून निघालेले विमान दुपारी 12.20 वा. दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचेल.