प्रतिनिधी /मडगाव
आम आदमी पक्षाचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असून सर्व सूत्रे दिल्लीतून हलविली जातात, येथील स्थानिक नेतृत्वाला ते किंमत देत नाही. त्यामुळे आपण आम आदमी पक्षाचा राजीनामा दिल्याची माहिती चांदोर येथील तियात्र कलाकार मिलाग्रीस दे चांदोर यांनी मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
कुंकळळी मतदारसंघाचा सर्वागिण विकास करण्यासाठी आपण आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आपची सर्व सूत्रे दिल्लीतून हलविली जातात, दिल्लीतून दिल्या जाणाऱया आदेशाचे पालन येथील नेत्यांना करावे लागते. येथील नेते कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. दिल्लीवरून हुकूमशाही चालते ते आपल्याला मान्य नाही. त्यामुळे आपण आपचा राजीनामा दिल्याचे मिलाग्रीस दे चांदोर म्हणाले.
आपण भविष्यात कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित केलेले नाही. मात्र, आपल्या समर्थकांना व कार्यकर्त्यांना विचारूनच निर्णय घेतला जाईल. मनोहर पर्रीकर हयात असताना आपण भाजपमध्ये होतो. भाजपसाठी आपण कार्य केले. मनोहर पर्रीकर हे चांगले नेते होते. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभले. त्याच्या सारखा नेता आजच्या घडीला गोव्यात नाही. त्यांच्या निधनानंतर आपण भाजपमधून बाहेर पडलो असे त्यांनी सांगितले.
फुटीर आमदारांना केक देण्याचा प्रकार चुकीचा होता काँग्रेस मधून दहा आमदार फुटले व त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. जेव्हा त्यांना दोन वर्षे पूर्ण झाली, तेव्हा त्यांच्या घरी भेट देऊन केक भेट देण्याचा आदेश दिल्लीवरून देण्यात आला. आपल्याला हा निर्णय अजिबात आवडला नाही. आपण एक कलाकार व चांगल्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचा सातत्याने प्रयत्न केलाय, त्यामुळे अशा वाईट गोष्टी करणे आपल्याला शक्य नव्हते. त्यामुळे आपण कुंकळळीचे आमदार क्लाफास डायस यांच्या घरी केक देणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले, तेव्हा पासून आपण आम आदमी पक्षापासून दूर गेलो होतो. शेवटी पक्षाचा राजीनामा दिला असे मिलाग्रीस दे चांदोर म्हणाले.