बाणावलीत उद्योजकांसाठी फोन लाइन सुरु
प्रतिनिधी /पणजी
आम आदमी पार्टीचे उमेदवार व्हेन्झी व्हिएगश यांनी सोमवारी बाणावलीतील उद्योजकांसाठी एक मोबाईल नंबर लॉन्च केला आहे. यात व्यापारी समुदायाने केलेल्या सूचना जाहीरनाम्यात समाविष्ट करण्यात येणार आहेत. दरम्यान बाणावली मतदारसंघासाठी व्हेन्झी यांच्या कामाने प्रभावित होऊन प्रसिद्ध उद्योजक आणि गोवन सिपचे मालक सॅटर्निनो रॉड्रिग्स यांनी व्हेन्झी यांना पाठिंबा जाहीर केला.
9851134134 हा क्रमांक नंबर लॉन्च केल्याची घोषणा करताना व्हिएगश म्हणाले की, बाणावलीच्या उद्योजकांनी कॉल किंवा मेसेज किंवा व्हॉट्सऍपवर जाहिरनाम्यासाठी त्यांच्या सूचना द्याव्या. हॉटेलियर, रेस्टॉरंट मालक, टॅक्सी ऑपरेटर किंवा इतर कोणतेही छोटे व्यवसाय मालक त्यांच्या सूचना देऊ शकतात आणि सर्व सूचना जाहीरनाम्यात समाविष्ट केल्या जातील, पुढील पाच वर्षात त्यांची अंमलबजावणी केली जाईल, अस ते पुढे म्हणाले.
बाणावलीत व्यवसाय, व्यवसायांचा विकास आणि व्यवसाय सुलभ करण्याच्या दृष्टीने एक जाहीरनामा तयार करण्यासाठी गोव्यातील व्यापारी पॅनेलची स्थापना केली जाईल. बाणावलीत हे अशा प्रकारचे पहिले उपक्रम आहे, असे ते पुढे म्हणाले.
कोविडने अनेक व्यवसायांचे नुकसान केले आहे. त्यामुळे त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे. बाणावलीतील व्यापारी समुदाय हप्ता आणि ’दादागिरी’मुळे कंटाळला आहे. मी अनेक वर्षांपासून व्यवसायात आहे आणि अनेक प्रसंगी ’दादागिरी’चा सामना केला आहे. खरे तर माझा व्यवसाय कायदेशीररित्या स्थापित केल्यामुळे, मला व्यवसाय करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही. मला आशा आहे हा प्रकार व्हेंन्झी थांबवू शकतील. असे पत्रकार परिषदेत बोलताना सॅटर्निनो रॉड्रिग्स म्हणाले,
सध्या व्यापाऱयांसाठी अनेक योजना आहेत. मात्र त्या कागदावरच राहिल्या आहेत. व्यापारी समुदायातील काही निवडक वर्गाला किंवा विशिष्ट मतदारसंघातील लोकांनाच त्यांचा लाभ मिळतो. त्यामुळे बाणावलीतील व्यापाऱयांनी पुढे येऊन मार्ग सुचवावा, असे आवाहन व्हेन्झी यांनी केले.