ऑनलाईन टीम / मुंबई :
भाजपच्या ऑपरेशन लोटस या फक्त अफवा आहेत. त्यांच्या ऑपरेशन लोटसकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे मासे त्यांच्या गळाला लागणार नाहीत, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राऊत बोलत होते. राऊत म्हणाले, भाजपकडे 105 आमदार असतानाही त्यांना सत्ता मिळाली नाही. त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना या धक्क्यातून सावरण्यासाठी त्यांना समुपदेशनाची गरज आहे.
त्यांच्याकडून सध्या सुरु असलेल्या ऑपरेशन लोटसकडे आम्ही मनोरंजन म्हणून पाहतो. राजकारणात असे मनोरंजन असायला हवे. त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी आमचे मासे त्यांच्या गळाला लागणार नाहीत. ऑपरेशन आम्हीही करतो. सर्वात जास्त चिरफाड आम्हीच करतो. त्यामुळे ऑपरेशन लोटसला कधीही यश येणार नाही, असेही राऊत म्हणाले.